घरमुंबईसीताराम कुंटेंच्या परवानगीविना रश्मी शुक्लांनी केले होते फोन टॅप

सीताराम कुंटेंच्या परवानगीविना रश्मी शुक्लांनी केले होते फोन टॅप

Subscribe

सर्व मंत्री वर्षा निवासस्थानी बैठकीला हजर, महाधिवक्ताही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

तत्कालीन गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि वद्यमान राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या परवानगीविना राज्य गुप्त विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी ठाकरे सरकारकमधील मंत्र्यांचे फोन टॅपिंग केले. सीताराम कुंटे हे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत असताना अतिरिक्त पोलीस संचालक रश्मी शुक्ला यांना फोन टॅपींगची परवानगी दिली असल्याचे रश्मी शुक्ला यांनी म्हटले होते. परंतु सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या परवानगीविना २ महिन्यांपूर्वी फोन टॅप केले असल्याचे समजते आहे. त्यामुळे या फोन टॅपींग प्रकरणात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची भूमिका संशयास्पद झाली होती. त्यामुळे या प्रकरणावर मुख्य सचिव सीताराम कुंटे येत्या दोन दिवसांत आपली भूमिका मांडतील.

राज्य मंत्रिमंडळात आज(बुधवार,२४ मार्च) फोन टॅपींग प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. सर्व मंत्री या फोन टॅपींग प्रकरणाच्या विषयावर आक्रमक झाले होते. मंत्रिमंडळात या विषयावर चर्चा झाल्यानंतर सर्व मंत्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी फोन टॅपींग प्रकरणात मी अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो असल्याचे म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, कृषी मंत्री दादाजी भुसे , अल्प संख्यांक मंत्री नवाब मलिक बैठकीला उपस्थित. तसेच महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी देखील वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. या बैठकीत रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंह यांच्यावर कोणती कारवाई करण्यात येणार यावर काय निर्णय होणार असल्याने याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

फडणवीसांना जशाच तसे उत्तर देणार

मुख्य सचिव सीताराम कुंटे उद्या पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा खुलासा करणार असल्याची शक्यता आहे. फोन टॅपींग करण्यात आले त्यावेळी सीताराम कुंटे हे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदी कार्यरत होते. तेव्हा रश्मी शुक्ला या अतिरिक्त पोलीस महासंचालक पदी कार्यरत होत्या. रश्मी शुक्ला या अनधिकृत फोन टॅप करत होत्या म्हणून त्यांची बदली करण्यात आली होती.

- Advertisement -

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह आणि गुप्तवार्ता विभागाच्या अधिकारी रश्मी शुक्ला यांनी सरकारवर उघडपणे केलेल्या आरोपांवरसुद्धा मंत्र्यांनी आगपाखड केली. या अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपाचा आधार घेत भाजप नेत्यांनी सध्या रान उठवले असल्याने या अधिकाऱ्यांवर कारवाईची मंत्र्यांनी जोरदार मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांनी केल्या मागणीची दाखल घेत तातडीने ज्येष्ठ मंत्र्यांना वर्षा बंगल्यावर पाचारण होण्यास सांगितले.

भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ मंत्र्यांना वर्षावर पाचारण केल्याने चर्चेला चांगलेच उधाण आले आहे. मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर वर्षावर सर्व प्रमुख मंत्री हजर होते. वाझे प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार होत असल्याच्या गंभीर आरोपांनंतर सरकार बॅकफूटवर आले. मात्र आता आणखी वेळ वाया घालवण्यात अर्थ नसल्याने पोलीस अधिकाऱ्यांवर अंकुश राखण्याबरोबरच अशा बेशिस्त अधिकाऱ्यांविरोधी कडक कारवाईची मागणी मंत्र्यांनी बैठकीत केली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -