Fort Building Collapse – पीडित रहिवासी अजूनही पुनर्वसनाच्या प्रतिक्षेतच!

fort building collapse incident

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात गुरुवारी कोसळलेल्या भानुशाली इमारतीचा ढिगारा उपसण्याचे काम शनिवारीही सुरूच होते. या इमारतीचा ढिगारा उपसला तर बाजूची इमारत ढासळण्याची शक्यता असल्यामुळे या इमारतीच्या बाजूची इमारती खाली करण्यात आलेली आहे. आणि सदरची इमारती पाडण्यात येणार असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शनिवारी घडलेल्या या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १० वर पोहोचली आहे, तर दोन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या इमारतीतील १७ रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. उर्वरित इमारतीचा भाग पाडून टाकण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. परंतु अद्याप तो भाग तसाच आहे.

मिंट रोड वरील १०० वर्षांहून अधिक जुनी ही इमारत असून म्हाडातर्फे इमारत २००२ साली दुरुस्त करण्यात आली होती. या इमारतीत २७ निवासी आणि ३१ व्यावसायिक गाळे होते. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देखील देण्यात आले होते. म्हाडाने प्रवाशांच्या सुरक्षेबाबत संबंधितांकडून हमीपत्रही घेतले होते, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. पालिकेने इमारतीच्या दुरुस्तीसाठी जून २०१९ मध्ये आईओडी आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्याची परवानगी दिली होती. इमारतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला परवानाही पालिकेकडून १ जून २०१९ रोजी देण्यात आला होता. त्याचप्रमाणे दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील रहिवाशांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात जागा उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले आहे.

भानुषाली इमारतीला लागूनच असलेली पोरवाल मेडिकल अँड जनरल स्टोअरची इमारत खाली करण्यात आली असून सदरची इमारत तळमजल्यावर ५ मजले असून या इमारतीतील घरं खाली करण्यात आली आहेत. भानुशाली इमारतीचा ढिगारा काढला तर ही इमारत पडेल या भीतीपोटी येथील रहिवाशांची घरं खाली करून मग इमारत पाडण्यात येणार असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, भानुशाली इमारतीतील बेघर झालेल्या रहिवाशांचं म्हाडा संक्रमण शिबिरात तात्काळ पुनर्वसन करावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली असल्याचे फोर्ट विभागातील माजी नगरसेवक गणेश यशवंत सानप यांनी ‘दैनिक महानगर’शी बोलताना सांगितले.

building collapsed at fort mumbai