घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटधारावी-दादर, गोवंडी-मानखुर्द, वांद्रे-सांताक्रुझमध्ये कोरोना रुग्ण शंभरीच्या उंबरठ्यावर!

धारावी-दादर, गोवंडी-मानखुर्द, वांद्रे-सांताक्रुझमध्ये कोरोना रुग्ण शंभरीच्या उंबरठ्यावर!

Subscribe

प्रभादेवी, वरळी या ‘जी दक्षिण’ आणि भायखळा, नागपाडा या ‘ई’ विभाग तसेच ग्रँटरोड, मलबारहिल, वाळकेश्वर या ‘डि’ विभागात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे

प्रभादेवी, वरळी या ‘जी दक्षिण’ आणि भायखळा, नागपाडा या ‘ई’ विभाग तसेच ग्रँटरोड, मलबारहिल, वाळकेश्वर या ‘डि’ विभागात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. या तिन्ही विभागांमध्ये कोरोनाग्रस्तांनी शंभरी पार केलेली असतानाच दादर-माहिम-धारावी या ‘जी-उत्तर’ विभाग, गोवंडी-मानखुर्द या ‘एम-पूर्व’ विभाग तसेच वांद्रे ते सांताक्रुझ पूर्व या ‘एच-पूर्व’ या तिन्ही विभागांमध्ये कोरोनाग्रस्त  शंभरीच्या उंबरठ्यावर आहेत. या तिन्ही विभागांमध्ये अनुक्रमे ९७, ९५ व ९६ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत.

वरळीतील आकडा मुंबईच्या चिंतेत भर पाडणारा

मुंबईत १४ एप्रिलपर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या १ हजार ७५३ वर पोहोचली आहे. मुंबईत सर्वांधिक कोरोनाग्रस्तांची संख्या जी-दक्षिण विभागात आहे. या विभागात मंगळवारपर्यंत ३०८ एवढी कोरोनाग्रस्तांची संख्या होती. परंतु मंगळवारी ही संख्या ३६० वर पोहोचली आहे. त्यामुळे पुन्हा वरळीत कोरोनाग्रस्तांची संख्या एकाच दिवसांत ५२ ने वाढली आहे. त्यामुळे वरळीतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच असल्याने परिस्थिती हाताबाहेरच चालली आहे.

- Advertisement -

प्रशासनाला या विभागात नियंत्रण मिळवणे कठीण होत चालले आहे. विशेष म्हणजे हा मतदारसंघ पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा असून अन्य विभागांमध्ये प्रत्येक सहायक आयुक्त कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात आणण्यात यशस्वी ठरत आहे. मात्र वरळीतील परिस्थिती नियंत्रणाबाहेर असून महापालिका आयुक्तांनी तसेच कोरोनासाठी नियुक्त केलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या टिमने याठिकाणी संख्या नियंत्रण आणण्यासाठी कोणत्याही उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली नाही. त्यामुळे वरळीतील वाढणारा कोरोनाग्रस्तांचा आकडा मुंबईच्या चिंतेत भर पाडणारा आहे.

- Advertisement -

मंबईतील भायखळा, नागपाड्याच्या ई विभागात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. कोरोना रुग्णांची संख्येत १० रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांची संख्या १२५ वरून १३५ एवढी झाली आहे. तर ग्रँटरोड, मलबारहिल या डि विभागातील १०७ रुग्णांच्या तुलनेत आणखी २२ रुग्णांची भर पडून येथील कोरोनाग्रस्तांची संख्या १३० वर पोहोचलेली आहे.

या भागात कोरोनारुग्ण शंभरीच्या उंबरठ्यावर!

धारावी, दादर, माहिम येथील संख्या वाढतच चालली असून जी-उत्तर विभागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ९७ एवढी आहे. यामध्ये धारावीमध्ये सर्वांधिक ६० रुग्ण, तर दादरमध्ये २१ आणि माहिममध्ये ७ आदी रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील आकडा दिवसेंदिवस वाढत चालल्याने जी-उत्तर विभागही आता कोरोना रुग्णांच्या यादीत शंभरीच्या उंबरठ्यावर आहे.

या पाठोपाठ वांद्रे ते सांताक्रूझ पूर्व या एच- पूर्व विभागात ९६, गोवंडी, देवनार-एम पूर्वमध्ये ९५, विलेपार्ले ते जोगेश्वरी पूर्व या के-पूर्व विभागात ९०, विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम या के-पश्चिममध्ये ८८, कुर्ला एल विभागात ८५, भांडुप,पवई, विक्रोळी या एस विभागात ६७, चेंबुर, देवनार या एम-पश्चिम विभागात ६२, वडाळा, शीव-अॅन्टॉप हिल या एफ-उत्तर विभागात ५८, मालाड पी-उत्तर विभागात ५७, मस्जिद बंदर, पायधुणी या बी विभागात ४६, परेल, शिवडी, लालबाग या एफ-दक्षिण विभागात ४१, नरीमन पॉईंट-फोर्ट- कुलाबा या ए विभागात ३९, घाटकोपर एन विभाग ३८, कांदिवली आर-दक्षिण या विभागात ३६, वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम या एच-पश्चिम विभागात ३४, गोरेगाव पी-दक्षिण विभागात ३४, बोरीवली या आर-मध्य विभागात २६, दहिसर आर-उत्तर विभागात १३, चिराबाजार, चंदनवाडी या सी विभागात १३ आणि मुलुंड टी विभागात ११ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -