घरCORONA UPDATECoronavirus : आरोग्य केंद्र, दवाखान्यांमधील डॉक्टर्स, नर्सेससह पॅरामेडिकल स्टाफच्या आरोग्याची आता विशेष...

Coronavirus : आरोग्य केंद्र, दवाखान्यांमधील डॉक्टर्स, नर्सेससह पॅरामेडिकल स्टाफच्या आरोग्याची आता विशेष काळजी!

Subscribe

दवाखाने व आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्सेससह आरोग्य सेविका आणि किटक नाशक विभागातील कामगार, कर्मचारी यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. कोरोनातील लढ्यात हे प्रमुख सैनिक आहेत.

कोरोना विरोधातील लढ्यात अग्रस्थानी असलेल्या दवाखाने व आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्सेससह आरोग्य सेविका आणि किटक नाशक विभागातील कामगार, कर्मचारी यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. कोरोनातील लढ्यात हे प्रमुख सैनिक आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राखण्याच्या दृष्टीकोनातून त्यांना पोषक आहार देत त्यांची प्रतिकार शक्ती अधिक वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महापालिकेच्या परिमंडळ सहामधील घाटकोपर विभागातून याची सुरुवात होणार आहे.

मुंबईत कोरोनाग्रस्त आढळून आला की तेथील क्षेत्र बाधित म्हणून जाहीर करण्यात येते. त्यामुळे या बाधित क्षेत्रांमध्ये जावून आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स आणि आरोग्य सेविकांचे पथक येथील लोकांची माहिती घेवून सर्व्हे करते आणि अति संपर्कात आणि त्याखालोखाल संपर्कात असलेल्या लोकांची यादी बनवून त्याप्रमाणे क्वारंटाईनमध्ये पाठवण्याची व्यवस्था हे पथक करत असते. तसेच विभागातील कोणताही रुग्ण महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये जावून उपचार घेत असतो. परंतु या आरोग्य केंद्र तसेच दवाखान्यांमधील डॉक्टर्स व कर्मचारी अप्रत्यक्ष कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येत असतात. पण या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजीच महापालिकेच्यावतीने घेतली जात नाही. त्यांना ना पीपीई किट दिले जात, ना त्यांच्या जेवणाची व्यवस्था करत नाही त्यांना पोषक आहाराची व्यवस्था करत. त्यामुळे कोरोनाग्रस्त रुग्णाची ओळख पटण्यापूर्वीच हे डॉक्टर्स व त्यांचे पथक एकप्रकारे कोरोनाग्रस्तांचा सामना करत असता. परंतु त्यांच्या आरेाग्याचीच काळजी न घेतल्यामुळे कोरोनाच्या लढ्यात अग्रस्थानी असलेले हे सैनिक कधी कोसळून पडतील याचा नेम नाही. त्यामुळे याबाबत सर्व स्तरातून चिंता व्यक्त होत असतानाच महापालिका परिमंडळ ६ चे उपायुक्त विजय बालमवार यांनी या सैनिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी आराखडा तयार केला आहे.

- Advertisement -

यामध्ये आरोग्य केंद्रातील जे डॉक्टर्स तसेच आरोग्य सेविका यांना पोषक आहार देण्यात येणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी हॉटेल, लॉजमध्ये राहणाऱ्या डॉक्टर्ससह पॅरॉमेडिकल स्टाफ कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुचनेनुसार जेवण पुरवले जाईल. त्यासाठी कॅटरर्सची व्यवस्था केली आहे. त्यामध्ये त्यांच्या आवडीनुसार मेन्यू ठरवला जाईल. तसेच त्यांना सफरचंद, संत्रा, केळी आदी फळेही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

याबरोबरच आरोग्य केंद्र व दवाखान्यांमधील जे कर्मचारी घरी जाणार आहे, त्यांना घरी सोडण्यासाठी व आणण्यासाठी वाहनांची सुविधा केली जाईल. तसेच विटामीन सी च्या गोळ्या उपलब्ध करू दिल्या जातील. ज्या त्यांना दिवसांतून दोन घ्याव्या लागतील.

- Advertisement -

हे सर्व डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्य सेविकांसह फवारणी करणारे किटक नाशक विभागातील कामगार, कर्मचारी हे एकप्रकारे करोनाविरोधातील लढ्यात पुढे आहेत. जर त्यांना काही झाले तर आपण लढाईत कमी पडू. याचाच विचार करत त्यांचे आरोग्य योग्य राखतानाच त्यांची प्रतिकार शक्ती वाढवणेही महत्वाचे आहे. त्यादृष्टीकोनातून परिमंडळ सहामधील घाटकोपरपासून याची सुरुवात होईल. त्यानंतर एस व टी विभागातील आरोग्य केंद्र व दवाखान्यांमधील डॉक्टर्स, नर्सेस व आरोग्य सेविकांच्या आरोग्याच्यादृष्टीकोनातून त्याप्रमाणे सुविधा पुरवल्या जाणार असल्याचेही परिमंडळ ६ चे उपायुक्त विजय बालमवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -