घरमुंबईठाण्यात अपघात रोखण्यासाठी 'रोबोट'ची मदत

ठाण्यात अपघात रोखण्यासाठी ‘रोबोट’ची मदत

Subscribe

शाळा, महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांसह मॉलमध्येही आता रोबोट अपघातांच्या नियमांबाबत जनजागृती करताना दिसणार आहे.

ठाणे जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. पोलीस आणि वाहतूक विभागाकडून विविध उपक्रम आणि जनजागृती देखील केली जात आहे. पण, त्यानंतर देखील अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक पोलीस आता रोबोटची मदत घेणार आहेत. वाहतूकीचे नियम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी आता रोबोटची मदत घेण्याचे वाहतूक शाखेने ठरवले आहे. त्यामुळे २२ जानेवारीपासून ठाणे वाहतूक पोलिसांबरोबर हा रोबोट वेगवेगळ्या ठिकाणी नियमांबाबत जनजागृती करताना दिसणार आहे. शाळा, महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांसह मॉलमध्येही आता रोबोट अपघातांच्या नियमांबाबत जनजागृती करताना दिसणार आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांसह वाहन परवानाधारक चालकांना तो वाहतूकीचे नियम आपल्या खास शैलीमध्ये सांगणार आहे. वाहतुकीचे नियम पाळल्यामुळे जीव कसा वाचू शकतो, याबाबतची जनजागृती रोबोट करणार आहे. यामध्ये हेल्मेट वापरण्यापासून ते कार चालकांना सीट बेल्ट लावण्यापर्यंतचे धडे देखील रोबोट देणार आहे. शिवाय, मुलांना झेब्रा क्रॉसिंगचे महत्त्व देखील रोबोट पटवून देणार आहे. तसेच, वाहतूक चिन्हांची ओळख देखील करू दिली जाणार आहे. वाहतूक शाखेच्या या स्तुत्य उपक्रमामुळे ठाण्यातील अपघातांचे प्रमाण कमी होईल अशी आशा ठाणेकर व्यक्त करीत आहेत.

ठाण्यात अपघातांमुळे २२९ बळी

“ठाणे जिल्ह्यामध्ये जानेवारी २०१८ ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत २२९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ५६२ जण गंभीर जखमी झाले आहे. शिवाय, किरकोळ जखमींची संख्या ३३४ आहे. २०१७ साली २०१ जणांना अपघातामध्ये आपला जीव गमवावा लागला होता. तर, अपघातामध्ये ५०५ जण गंभीर जखमी आणि ३८६ जण किरकोळ जखमी झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीची आकडेवारी जास्त आहे.

- Advertisement -

नागरिकांमध्ये आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाहतूकीच्या नियमांची जागृती करण्यासाठी वाहतूक विभागाकडून नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. मागील महिन्यात वेगवेगळ्या कार्यक्रमातून याबाबत जनजागृती करण्यात आली. मात्र तरीही अपघातांचे प्रमाण कमी होत नाही. ही बाब चिंतेची आहे. यासाठी आता रोबोटच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचा प्रचार करण्यात येणार आहे. – अमित काळे, पोलीस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -