घरCORONA UPDATEइस्लामपुरातला कोरोना हा मोदींचा प्रकोप? शिवसेनेची भाजप प्रवक्त्यांवर खरपूस टीका!

इस्लामपुरातला कोरोना हा मोदींचा प्रकोप? शिवसेनेची भाजप प्रवक्त्यांवर खरपूस टीका!

Subscribe

भाजप प्रवक्त्यांनी केलेल्या वक्तव्यावर आता सामनाच्या अग्रलेखातून खरपूस टीका करण्यात आली आहे.

‘इस्लामपुरात जे घडलं ते वाईटच. पण विनाकारण मोदीजींवर टीका केली, तर शिक्षा तर भोगावीच लागेल मंत्रीजी’, अशी
वायफळ टीका करणारे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांच्या विधानाचा आज सामनाच्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. राज्य कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी ‘लॉकडाऊन आधीच जाहीर करायला हवे होते, रात्री ८ वाजता जाहीर करायला ती काही नोटबंदी नव्हे’, अशी टीका त्यांच्या ट्वीटरवर केली होती. त्याला उत्तर देताना अवधूत वाघ यांनी
केलेल्या या अनाकलनीय टीकेला सामनाच्या अग्रलेखातून उत्तर देण्यात आलं आहे. ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तर मोदींचे पक्के चाहते आहेत. त्यांनी मोदींचे लांगुलचालनच केले. पण तरी देखील अमेरिकेत कोरोनाने हाहा:कार उडवला. न्यूयॉर्क मृतवत झालं आहे. सांगलीतलं इस्लामपूर आणि अमेरिकेतलं न्यूयॉर्क या शहरांना कुणी शिक्षा दिली, याचा खुलासा कुणी करेल का?’ असा सवाल या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.

‘मोदींवर टीका करणाऱ्या प्रत्येक गावात कोरोना घुसू द्या’

दरम्यान, अवधूत वाघ यांच्या विधानाचा समाचार घेताना अग्रलेखात म्हटलं आहे की ‘असं असेल, तर ज्यांनी ज्यांनी या काळात मोदींवर टीका केली, त्या प्रत्येकाच्या गावात, घरात, जिल्ह्यात कोरोना घुसू द्या आणि बळी जाऊ द्या, असं भाजपच्या प्रवक्त्यांना वाटत असावं. मोदींवर टीका करण्याची शिक्षा मृत्यूदंडाच्या रुपाने मिळावी असंही त्यांचं म्हणणं असावं. देशातलं वातावरण काय आहे आणि हे लोक काय अकलेचे तारे तोडत आहेत? मोदी विष्णूचे चौदावे अवतार आहेत अशा प्रकारची मुक्ताफळं उधळणाऱ्यांनीच महाराष्ट्राला कोरोनाचा शाप दिला, असं उद्या कुणी म्हटलं तर?’ असा सवाल देखील यात विचारण्यात आला आहे.

- Advertisement -

‘संपूर्ण देश मोदींच्या पाठिशी’

कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्ये संपूर्ण देश मोदींच्या पाठिशी आहे, असं यात नमूद करण्यात आलं आहे. ‘पंतप्रधान मोदी आणि त्यांची टीम कोरोनाशी लढा देत आहे. संपूर्ण देश मोदींच्या पाठिशी आहे. राहुल गांधींनी देखील मोदींच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. पण स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचेच मेंदू सडले आहेत. ही विधानं मोदींच्या कानांवर गेली, तर मोदीच अशा भंपक मंडळींबाबत कठोर निर्णय घेतील. अंधश्रद्धा निर्मूलन वाल्यांसाठी ही योग्य केस आहे. मोदींवर टीका केल्यास महामारी पसरते. अशी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई व्हावी,’ अशी मागणी देखील यात करण्यात आली आहे.


Corona Live Update – आज सकाळची कोरोनाग्रस्तांची आकडेवारी!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -