घरताज्या घडामोडीराष्ट्रीय राजकारणात पोकळी, आता उद्धव ठाकरेंनी लक्ष घालावं - संजय राऊत

राष्ट्रीय राजकारणात पोकळी, आता उद्धव ठाकरेंनी लक्ष घालावं – संजय राऊत

Subscribe

‘येत्या काही काळात राष्ट्रीय राजकारणात मोठ्या उलथा-पालथी होऊ शकतात. तिथे एक मोठी पोकळी मला दिसत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व सांभाळून आता राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालायला हवं, तिथे नेतृत्व करायला हवं’, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे. उद्धव ठाकरे आज ६०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छांबद्दल राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली सविस्तर भूमिका मांडली. ‘शरद पवारांप्रमाणेच आता उद्धव ठाकरेंनी देखील राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालायला हवं’, असं देखील संजय राऊत यांनी नमूद केलं.

- Advertisement -

‘आख्ख्या देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे’

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ६०व्या वाढदिवशी मी शुभेच्छा दिल्या की त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवताना राष्ट्रीय राजकारणात नेतृत्व करावं. आज राष्ट्रीय राजकारणात मला पोकळी दिसत आहे. शरद पवार या ज्येष्ठ नेत्यांप्रमाणेच उद्धव ठाकरेंनी देखील राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालावं. त्यांच्यात असं राष्ट्रीय नेतृत्व करण्याची क्षमता आहे हे गेल्या अनेक वर्षांपासून मी पाहातोय. राज्याचा मुख्यमंत्री हा जणू राष्ट्राचा नेताच असतो. देशाचं महाराष्ट्राकडे लक्ष असतं. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी राज्याचं नेतृत्व केलं, ही राष्ट्रीय राजकारणातली उलथापालथ होती. महाराष्ट्राचं नेतृत्व सांभाळून त्यांनी राष्ट्रीय राजकारणात लक्ष घालणं महत्त्वाचं आहे. राष्ट्रीय राजकारणात भविष्यात मोठ्या उलथापालथी होतील असं मला दिसतंय.’, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

पंतप्रधान तरी कुठे बाहेर पडतात?

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर न पडता घरातूनच कारभार करतात, या टिकेला देखील संजय राऊत यांनी उत्तर दिलं. ‘महाराष्ट्रात ११ कोटी मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरेंमुळे प्रत्येक मराठी माणसाला वाटतंय की मीच मुख्यमंत्री आहे. चंद्रकांत पाटलांना वाटत असेल की तेच मुख्यमंत्री आहेत, तर त्यांचं मी स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे कुठेही फिरत नाहीत. आपल्या जागेवर बसूनच सर्व कार्यभार करत आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी लागलीच यासंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा करायला हवी’, असं ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -