घरमुंबईसंजीव जैस्वाल वैद्यकीय रजेवर

संजीव जैस्वाल वैद्यकीय रजेवर

Subscribe

ठाणे महापालिकेत मागील पाच वर्षे आयुक्तपदावर

गेल्या काही दिवसांपासून ठाणे पालिकेच्या राजकीय शीतवादळात अखेर शुक्रवारी पालिका आयुक्त संजीव जैस्वाल यांनी राज्य सरकारकडे वैद्यकीय रजेचा अर्ज सादर करत ठाणे महानगर पालिकेला रामराम ठोकला आहे. ठाण्याचे पालकमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिकेतील अंतर्गत बदल्यांमध्ये हस्तक्षेप करत आयुक्तांनी केलेल्या बदल्या रद्द करण्यास भाग पाडले होते. त्यामुळे प्रचंड नाराज झालेल्या जैस्वाल यांनी पालिका अधिकार्‍यांवर यथेच्छ तोंडसुख घेत त्यांना पालिकेच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर शिवीगाळ केली होती. शुक्रवारी विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले होते.

संजीव जैस्वाल हे गेली पाच वर्षे ठाणे पालिका आयुक्त म्हणून काम करत होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत मर्जीतील सनदी अधिकारी अशी जैस्वाल यांची ओळख होती. नागपूर येथील असल्याने जैस्वाल आणि फडणवीस यांची जोडगोळी ठाण्यातच नव्हेतर मंत्रालयातही चर्चेचा विषय होती. फडणवीस यांचा वरदहस्त असल्याने जैस्वाल ठाण्यात स्वत:च्या मर्जीप्रमाणे काम करत होते. त्यांनी ठाण्याच्या विकासाला प्राधान्य दिले मात्र राजकीय नेत्यांना पालिका कारभारात फारशी ढवळाढवळ करु दिली नाही.

- Advertisement -

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यापूर्वी पालिकेत जैस्वालराज होते. त्यामुळे आताचे नगरविकास मंत्री यांचेही जैस्वाल यांच्यासमोर फार काही चालत नसे. मात्र फडणवीस यांच्याशिवाय जैस्वाल कुणाचेच ऐकत नसल्याने एकनाथ शिंदे यांची कुचंबणा झाली होती. फडणवीस यांनी जैस्वाल यांना ठाण्यात शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी पूर्णपणे वापरुन घेतले. त्यामुळेच त्यांची तीन वर्षांची टर्म झाल्यानंतरही आणखीन तब्बल दोन वर्षे म्हणजेच पाच वर्षे ठाणे पालिकेतच ठेवण्यात आले.

जैस्वाल हे फडणवीसांच्या इतके नजिकचे होते की ठाण्यातील भाजप नेत्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचे ठरवल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी जैस्वाल यांचीच पाठराखण केली. फडणवीस यांचे सरकार गेले आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. त्यात नगरविकास खात्यासारखे अत्यंत महत्वाचे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आले. त्यामुळे जैस्वाल यांच्या निर्णयात शिंदेंचा हस्तक्षेप वाढू लागला होता. त्यातच काही दिवसांपूर्वी पालिकेतील अधिकार्‍यांच्या आयुक्तांनी अंतर्गत बदल्या केल्या. त्या बदल्यांचा वाद नगरविकास मंत्र्यांकडे काही अधिकार्‍यांनी नेला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी या बदल्या आयुक्तांना रद्द करण्यास सांगितले. आयुक्तांनी बदल्या रद्द केल्या मात्र त्यावरुन त्यांनी पालिकेच्या अधिकार्‍यांवर यथेच्छ तोंडसुख घेत त्यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर शिवीगाळ केली. ही शिवीगाळ व्हायरल झाली. त्यामुळे जैस्वाल पुन्हा वादाच्या भोवर्‍यात अडकले.

- Advertisement -

जैस्वाल आणि एकनाथ शिंदे यांच्यातील मतभेद यामुळे अधिक ठळकपणे उघड झाले. त्यामुळे नाराज झालेल्या जैस्वाल यांनी शुक्रवारी अखेर स्वत: मंत्रालयात जाऊन आपण वैद्यकीय रजेवर जात असल्याचा अर्ज सादर केला. त्यामुळे जैस्वाल यांनी ठाणे पालिकेला ५ वर्षांनी का होईना राम राम ठोकल्याचे मानले जाते.

मी सरकारकडे वैद्यकीय सुट्टीसाठी शुक्रवारी अर्ज केला आहे. तो संमत झाल्यावर लगेचच मी सुट्टीवर जाणार आहे.
-संजीव जैस्वाल, आयुक्त, ठाणे महानगरपालिका.

जैस्वाल यांना म्हाडात आणण्यास राष्ट्रवादीतूनच विरोध

संजीव जैस्वाल हे मागील ५ वर्षांहून अधिक काळ ठाणे महापालिकेत आयुक्तपदावर होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. भाजप सरकार पायउतार झाल्यानंतर त्यांची तात्काळ बदली केली जाईल, असे सांगण्यात येत होते. मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध सर्व ठाणेकरांना माहित आहेत. आव्हाड गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर जैस्वाल हे म्हाडामध्ये जातील, अशी चर्चा मागील दोन महिने सुरू होती. मात्र म्हाडामध्ये त्यांना आणण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीच विरोध केल्याची खात्रीलायक माहिती आहे. मागील आठवड्यात जैस्वाल यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची पुन्हा एकदा भेट घेतली होती. मात्र गुरुवारीच त्यांना आपली वर्णी म्हाडात लागणार नाही, याची कुणकुण लागल्यानेच शुक्रवारपासून ते वैद्यकीय रजेवर गेल्याची माहिती मिळत आहे. त्यातच पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गेले काही महिने त्यांचे जमत नसल्याने आणि दोन आठवड्यांपूर्वी ठाणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या वॉट्स ग्रूपवरील जैस्वाल यांच्या वादग्रस्त संदेशांमुळे ते अडचणीत आलेले होते. शुक्रवारी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार आणि अधिकार्‍यांचे वादग्रस्त संदेश वाचून दाखवत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -