घरमुंबईबँकांच्या वसुली ‘भाईं’ना चाप आरबीआयची लवकरच नियमावली

बँकांच्या वसुली ‘भाईं’ना चाप आरबीआयची लवकरच नियमावली

Subscribe

कर्जाची वसुली करताना अनेकदा बेकायदेशीर मार्गांचा वापर केला जातो. त्यामुळे कर्जदारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातून ते नैराश्याच्या गर्तेतही सापडतात. अनेकदा कर्ज वसुलीसाठी बँका गावगुंडांची मदत घेतात. अशा ‘भाईं’कडून कर्जदारांना शिवीगाळ व मारहाणही केली जाते, मात्र आता रिझर्व्ह बँकेने वसुली भाईंना चाप लावण्यासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वसुली एजंटांसाठी आदर्श नियमावलीदेखील जारी केली आहे.

साधारणपणे आपत्कालीन परिस्थितीत, अचानक काही आवश्यक गरज असेल तेव्हा किंवा विविध कारणास्तव नागरिक कर्ज घेतात. सुरुवातीचे काही हप्ते भरल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे, उत्पन्नात पडलेल्या खंडामुळे किंवा व्यवसायातील मंदीमुळे त्यांना पुढचे हप्ते भरणे शक्य होत नाही किंवा त्यासाठी विलंब होतो. परिणामी कर्जदार डिफॉल्टरच्या यादीत जातात. अशा वेळी बँकांकडून कर्ज वसुलीसाठी रिकव्हरी एजंट्सचा वापर केला जातो. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा कोणत्याही माध्यमाचा उपयोग केला जातो. वेळी अवेळी फोन करून कर्जदारांवर दादागिरी करणे, शिवीगाळ करणे, अनेकदा कर्जदाराला मारहाण करणे, अपमानित करणे, जबरदस्तीने कर्जदाराच्या घरात घुसून त्याच्या घरातल्या चीजवस्तू जप्त करणे असे अनेक प्रकार त्यांच्याकडून केले जातात.

- Advertisement -

या भाईंमुळे अनेक नागरिक तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत, मात्र रिझव्ई बँक ऑफ इंडियाने रिकव्हरी एजंट्सच्या या हरकतींची गांभीर्याने दखल घेतल्याने यावर कठोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. हे रिकव्हरी एजंट्स चुकीच्या पद्धतीने वागतात. त्यांची वागणूक योग्य नाही, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी स्पष्ट केले. ज्या अनियंत्रित फायनान्स कंपन्यांकडून हे प्रकार सर्रास होतात, याबाबतच्या तक्रारी आरबीआयकडे प्राप्त झाल्या आहेत, तर काही नियंत्रित फायनान्स कंपन्यांकडूनही असे प्रकार होत असल्याचे दास यांनी सांगितले. आता याबाबत तक्रारी आल्यानंतर कायदेशीर कारवाई करणार्‍या यंत्रणांना याची माहिती दिली जाणार असल्याचेही दास म्हणाले.

कर्ज वसुलीसाठी काय आहे नियमावली?
=रिकव्हरी एजंट्स कर्जदारांना धमकी किंवा दादागिरी करू शकत नाहीत.
=शारीरिक दुखापत वा तोंडी शिवीगाळही करू शकत नाहीत.
=कर्जदारांना सकाळी ९ वाजेपूर्वी आणि संध्याकाळी ६ वाजेनंतर फोन करणे गुन्हा आहे.
=कर्ज वसुलीसाठी गुंडगिरीचा वापर करणे किंवा धमकी देणे हे छळात मोडते.
=कर्जदार काम करीत असलेल्या कामाच्या ठिकाणी सूचना न देता जाणे तसेच गैरमित्रांना किंवा सहकार्‍यांना धमकीचे फोन करू नयेत.
=धमकीत अभद्र भाषेचा वापर छळाचाच भाग मानला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -