घरमुंबईआम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करु - शरद पवार

आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करु – शरद पवार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र, शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या प्रतिक्रियेमुळे सत्ता स्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे.

‘राज्यातील जनतेने शिवसेना आणि भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे सेना आणि भाजपने लवकरात लवकर सरकार स्थापन करावे. आम्हाला जनतेने विरोधात बसण्याची संधी दिली आहे. पण ज्यांना लोकांनी संधी दिली त्यांनी लवकरात लवकर सरकार बनवावे आणि आम्हाला विरोधात बसण्याची संधी द्यावी. आम्ही जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करु’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. मुंबईच्या वायबी चव्हाण सेंटर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रातील नवे सरकार सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर या पत्रकार परिषदेकडे पाहिले जात होते. आज सकाळी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे ‘शिवसेना आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे सरकार येईल’, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. दरम्यान, पवार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या उत्तरावरुन सध्या स्थिती पाहता राष्ट्रवादी शिवसेनेसोबत जाणार नाही, असे चित्र स्पष्ट होत आहे.


हेही वाचा – जो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है- संजय राऊत

- Advertisement -

 

शेवटच्या एक तासात काहीही होऊ शकते – पवार

‘सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेला खुला पाठिंबा देईल आणि काँग्रेस पडद्यामागून पाठिंबा देईल’, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. अखेर या चर्चांना पूर्णविराम लागेल, असे बोलले जात होते. मात्र, तरीही या चर्चा सुरु राहण्याची शक्यता आहे. कारण भाजप आणि शिवसेनेची युती होऊन सरकार स्थापन होऊ शकले नाही तर राज्यातील सत्ता स्थापनाची गणिते वेगळे ठरु शकतात. कारण पवार यांनी ‘शेवटच्या एक तासात काहीही होऊ शकते’, असे म्हटले आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि या परिषदेत ‘१०५ आकडा ज्यांचा आहे त्यांनी सरकार बनवावं’, असे राऊत म्हणाले आहेत. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर सत्ता स्थापनेचा गुंता पुन्हा वाढला आहे. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष भाजपाला सत्ता स्थापन करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्री पदावरच युतीचा निर्णय झाला होता – संजय राऊत


 

शिवसेनेची नेमकी भूमिका काय?

राज्यात सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर प्रचंड वेगाने घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले. निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शिवसेना युती धर्म पाळेल’, असा दावा केला होता. मात्र, शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडून बसली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या आघाडीकडून जर शिवसेनेला पाठिंबा मिळाला तर राज्यात भाजपमुक्त सरकार स्थापन होऊ शकते, असा दावा केला जात होता. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्यात भेटीगाठी होत असल्याची माहिती समोर येत होती. याशिवाय गेल्या आठवड्यापासून संजय राऊत माध्यमांसमोर येऊन शिवसेनेची भूमिका मांडत आहेत. यामध्ये शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी आक्रमक भूमिका घेतल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची नेमकी भुमिका काय आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -