घरमुंबईशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालनासाठी 25 कोटी मंजूर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालनासाठी 25 कोटी मंजूर

Subscribe

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिले आदेश

भाईंदर-मीरा भाईंदर शहरात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने भव्य कला दालन उभे राहावे यासाठी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. त्याला आता यश आले असून या नियोजित कलादालनासाठी राज्य सरकारकडून 25 कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकासकामांचा आढावा घेण्यासाठी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना तसे आदेश दिले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावे भव्य कलादालन भाईंदर पूर्वेला आरक्षित जागेत आरक्षण क्रमांक 122 मध्ये उभे राहावे असा प्रस्ताव आमदार सरनाईक यांनी महापालिकेला दिला होता. स्वतः आमदार सरनाईक यांचा आमदार निधी 25 लाख, खासदार राजन विचारे यांचा खासदार निधी 25 लाख व शिवसेनेच्या चारही नगरसेवकांचा प्रत्येकी 12.50 लाखांचा नगरसेवक निधी असा निधी या कलादालनासाठी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी आधीच दिला आहे. हे कलादालन सुसज्ज व भव्य दिव्य असावे असा सरनाईक यांचा प्रयत्न आहे. यामुळे राज्य सरकारने कलादालनाच्या कामाला 25 कोटी निधी द्यावा, अशी मागणी आमदार सरनाईक गेल्या सरकारच्या काळात सतत करीत होते. मात्र हा निधी गेल्या सरकारच्या काळात राज्य सरकारकडून मंजूर होऊ शकला नव्हता.

- Advertisement -

नुकतेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन समिती सभागृहात ठाणे जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली होती. या बैठकीस उपस्थित असलेल्या आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा-भाईंदरमधील या नियोजित कलादालनाला राज्य सरकारकडून 25 कोटी निधी देण्याची मागणी या बैठकीत केली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सरनाईक यांच्या मागणीला तात्काळ पाठिंबा दिला. त्यावेळी या कलादालनाच्या कामाला राज्य सरकारकडून 25 कोटी निधी देण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना केले आहे. उर्वरित निधी मीरा-भाईंदर महापालिका खर्च करणार आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचे मुख्य सचिव, प्रधान सचिव, मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मीरा भाईंदर कलावंतांचे माहेरघर व्हावे – सरनाईक
या कलादालनात ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, जुनी पुस्तके असलेले भव्य ग्रंथालय,लहान मुलासाठी विविध उपक्रम राबविण्याची जागा, विज्ञानाची आवड असलेल्या मुलांसाठी विशेष कक्ष, संग्रहालय,ई लायब्ररी तसेच आपल्या कलेचे प्रदर्शन भरविण्यासाठी या कलादालनात प्रदर्शन भरविण्यासाठी जागा, मूर्तिकलेसाठी विशेष दालन अशा अनेक सुविधा या नियोजित कलादालनात असणार आहेत, असेही प्रताप सरनाईक म्हणाले. जुनी गाणी तसेच जुन्या साहित्यिक, राजकीय नेत्यांची भाषणे ऐकण्यासाठी विशेष कक्ष असणार आहे. या कलादालनात विविध सांस्कृतिक, साहित्यिक असे उपक्रम मीरा-भाईंदरमधील नागरिकांना राबवता येतील. परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन असे कार्यक्रम करता येतील. कलावंतांचे माहेरघर म्हणून मीरा भाईंदर शहराची ओळख बनावी हा आपला मानस आहे व त्यासाठी हे कलादालन होणे खूप गरजेचे आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीच्या धर्तीवर प्रदर्शनासाठी जागा तर नेहरू तारांगणच्या धर्तीवर विज्ञान प्रदर्शनाची सोय या कलादालनात असणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालनासाठी 25 कोटी मंजूर
Shashi karpehttps://www.mymahanagar.com/author/shashi-karpe/
गेली २५ वर्षे मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पत्रकारिता. राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण. वृत्तपत्र क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -