घरमुंबईआरेतील झाडे तोडण्यासाठी सदस्यांनी घेतली दीड कोटीची लाच

आरेतील झाडे तोडण्यासाठी सदस्यांनी घेतली दीड कोटीची लाच

Subscribe

 आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्ष तोडीचा प्रस्ताव मंजूर ,मातोश्रीवरून नगरसेवकांची झाडाझडती

मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी आरे कॉलनीतील झाडे कापण्याचा प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे नाराज झाले. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष न्यायालयाच्या वृक्ष प्राधिकरण समितीत न्यायालयाच्या आदेशाने नियुक्ती करण्यात आलेल्या वनस्पतीतज्ज्ञांनी २ हजार ७०० झाडे तोडण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी प्राधिकरणातील तज्ज्ञ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजुने मतदान करण्यासाठी दीड कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची मनमानी आणि वनस्पतीतज्ज्ञांच्या बेजबाबदारपणाविरोधात न्यायालयात जाणार आहेत.

…यामुळे प्रस्ताव मंजूर करण्यात आले यश

दरम्यान, शिवसेनेचे चार सदस्य या बैठकीला उशिरा पोहोचल्यामुळेच प्रस्ताव मंजूर करण्यात प्रशासनाला यश आले. या नगरसेवकांना मातोश्रीवरून बोलावून त्यांच्याकडून लेखी स्वरुपात खुलासा मागण्यात आला. यावेळी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे कारशेड आरे कॉलनीत उभारले जात असून यासाठी झाडे कापण्याचा बहुचर्चित प्रस्ताव शिवसेनेच्याविरोधानंतरही प्राधिकरणाच्या सभेत मंजूर करण्यात आला. या बैठकीला शिवसेनेचे नगरसेवक असलेले प्राधिकरणाचे चार सदस्य उशिराने सभेला पोहोचले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांकडून लेखी स्पष्टीकरण मागितलेे. यामध्ये सुवर्णा करंजे, प्रिती पाटणकर, रिद्धी खुरसुंगे आणि उद्यान व बाजार समितीचे अध्यक्ष उमेश माने यांचा समावेश आहे. प्राधिकरणाची बैठक १२ वाजता होती. परंतु हे सदस्य ४० मिनिटे उशिरा आले. सुरुवातीला भाजप व तज्ज्ञ मंडळीतील प्रत्येक एक सदस्य होता. त्यामुळे शिवसेनेचे सदस्य वेळेवर पोहोचले असते तर गणसंख्या पूर्ण होवून हा प्रस्ताव फेटाळता आला असता. परंतु हेच सदस्य उशिराने आल्याने १२ वाजताची बैठक १२ वाजून ५० मिनिटांनी सुरु झाली. परिणामी भाजपसह अन्य सदस्यही उपस्थित राहिले आणि शिवसेनेचे मनसुबे उधळले गेले. त्यामुळेच चार सदस्यांकडून लेखी खुलासा मागवून घेण्यात आला.

- Advertisement -

तज्ज्ञांनी घेतले दीड कोटी रुपये

कोर्टाच्या निर्देशानुसार वृक्षप्राधिकरणावर पाच सदस्यांची नेमणूक झाली आहे. त्यापैकी तीन सदस्य या बैठकीला उपस्थित होते. यातील सुभाष पाटणे यांनी प्रस्तावाच्या बाजुने मतदान करण्यासाठी कारशेडचे बांधकाम करणार्‍या ‘सॅम इंडिया’ या कंपनीकडून दीड कोटी रुपये घेतल्याचा आरोप स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला. हे दीड कोटी रुपये या तिन्ही सदस्यांनी वाटून घेतले आहेत. हे आपण जबाबदारीने बोलत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे याविरोधात आम्ही कोर्टात जाणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

शिवसेना-भाजपची ही मॅचफिक्सिंग

झाडे तोडण्यास काँग्रेसचा विरोध आहे. शिवसेना आणि भाजपची ही मॅचफिक्सिंग आहे. आमच्या सदस्यांना बोलू देत नसल्याने त्यांनी सभात्याग केला, त्यानंतर मतदानाची प्रक्रीया झाली. त्यामुळे झाडे कापण्याच्या या प्रस्तावाविरोधात पर्यावरणप्रेमी खासगी स्वयंसेवी संस्थांच्यावतीने आम्ही कोर्टात जाणार असून हे सर्व मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.

- Advertisement -

पैसे घेतले असतील घराची झडती घ्या

मेट्रोच्या प्रस्तावाला केवळ विकासाच्या मुद्यावर आम्ही झाडे कापण्याच्या बाजूने मतदान केले आहे. माझी प्रतिमा काय आहे, हे लोकांना माहित आहे. कुणी काहीही आरोप करू शकतो. जर मी पैसे घेतले असेल तर माझ्या घराची झडती घ्यावी. माझ्या घराण्याला दोन नंबरचा पैसा चालत नाही आणि कुठल्याही राजकीय दबावाखाली आम्ही याला पाठिंबा दिला नाही, असे प्राधिकरणाचे सदस्य सुभाष पाटणे यांनी स्पष्ट केले.

एक प्रतिक्रिया

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -