घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीत गेलेले शिवसेनेचे 'ते' नगरसेवक स्वगृही!

राष्ट्रवादीत गेलेले शिवसेनेचे ‘ते’ नगरसेवक स्वगृही!

Subscribe

काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या पारनेरमधले ५ नगरसेवक आणि महिला आघाडीच्या तालुका प्रमुखांनी शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता ते सर्व ६ जण पुन्हा शिवसेनेत दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ते पुन्हा स्वगृही परतले आहेत. या घटनेनंतर महाविकासआघाडीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हस्तक्षेप केला होता. त्याशिवाय अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात बैठक देखील झाली होती. यानंतर अखेर या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

shivsena corporator 1
शिवसेनेच्या या ५ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली..

मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात पार पडलेल्या बैठकीत याविषयी चर्चा झाली. त्यानंतर या सर्व नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेत पाठवण्याचा निर्णय झाला. या संपूर्ण प्रकरणात शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची मुत्सद्देगिरी कामी आल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दरम्यान, यासर्व नगरसेवकांनी मातोश्रीवर येऊन शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

- Advertisement -

पारनेरमधील नगरसेवक डॉ. मुदस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने या नगरसेवकांनी आणि महिला आघाडीच्या तालुका प्रमुख उमाताई बोरुडे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पारनेर नगर पंचायतीची मुदत येत्या काही दिवसांमध्येच संपत असल्यामुळे या नगरसेवकांचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जात होता. मात्र, आता खुद्द शरद पवार आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर या नगरसेवकांची घरवापसी झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -