घरमुंबईसेनेतील उपर्‍यांना महामंडळांची लॉटरी   

सेनेतील उपर्‍यांना महामंडळांची लॉटरी   

Subscribe

शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या १० महामंडळे आणि प्राधिकरणाच्या नियुक्त्यांवर नजर टाकली तर दुसर्‍या पक्षातून शिवसेनेत आलेल्या उपर्‍यांनाच आणि उपनेते असलेल्यांनाच राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेली पदे देण्यात आली.

शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या १० महामंडळे आणि प्राधिकरणाच्या नियुक्त्यांवर नजर टाकली तर दुसर्‍या पक्षातून शिवसेनेत आलेल्या उपर्‍यांनाच आणि उपनेते असलेल्यांनाच राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेली पदे देण्यात आली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात शिवसैनिकांत नाराजी पसरली असून आम्ही केवळ पक्षाचा झेंडाच खांद्यावर घ्यायचा आणि सतरंज्या उचलायच्या काय, असा सवाल केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेले उदय सामंत, पूर्वी मनसेत असलेले हाजी अराफत शेख, गेली १५ वर्षे विभागप्रमुख, उपनेते असलेलेे विनोद घोसाळकर, माजी सनदी अधिकारी आणि उपनेते असलेले विजय नाहटा, सहा महिन्यांपूर्वी उपनेते करण्यात आलेले रघुनाथ कुचिक आणि सात वर्षांपूर्वी पक्षात आलेले उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांना दिलेल्या बक्षिसामुळे प्रामाणिक काम करणार्‍या शिवसैनिकांची, पदाधिकार्‍यांची घोर निराशा झाली आहे. नियुक्त्यांनंतर अनेक पदाधिकार्‍यांनी शिवसेनेच्या नेत्यांकडे, संपर्क प्रमुखांकडे  नाराजी व्यक्त केल्याने आगामी काळात मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दररोज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उघडपणे भूमिका घेत असतात. तसेच मुखपत्रातून कायम मोदी आणि शहा यांच्यावर शाद्बिक फटकारेही मारत असतात.दोनच दिवसांपूर्वी शिवसेना भवन इथे झालेल्या बैठकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला होता आणि युतीचा विचार न करता निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेशच दिला होता. त्यामुळे बैठकीतून बाहेर पडल्यानंतर मुंबईतील कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीसाठी एकच उत्साह निर्माण झाला होता. मात्र शुक्रवारी जाहीर झालेल्या महामंडळे, प्राधिकरणाच्या नियुक्त्या बघितल्या असता गावागावांत शिवसेना वाढवणार्‍या कार्यकर्त्यांची उपेक्षाच झाली आहे. आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले उदय सामंत यांनी आपली महामंडळावर नियुक्ती करू नये, असे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले होते. मात्र त्यांची नाराजी दूर करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. तर काही वर्षांपूर्वी सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या आणि उपनेते असलेल्या विजय नाहटा यांचीही मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळावर सभापती म्हणून नियुक्ती केली आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचा दारुण पराभव झाला, त्याची जबाबदारी विजय नाहटा यांच्या खांद्यावर होती.

- Advertisement -

औरंगाबादचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, हिंगोलीचे जिल्हा प्रमुख संतोष बांगर, सोलापुरचे माजी जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बेर्डे, कराड माजी जिल्हा प्रमुख संजय मोहिते-पाटील आणि रायगडचे माजी जिल्हा प्रमुख बबन पाटील ही काही मोजकी नावे आहेत. पक्षाच्या आंदोलनासाठी केसेस घेऊनही महामंडळाची लॉटरी मात्र बाहेरुन पक्षात आलेल्या उपर्‍यांनाच देण्यात मातोश्रीने धन्यता मानल्याची खंत एका उपनेत्याने ‘आपलं महानगर’शी बोलताना व्यक्त केली. तसेच मुंबईतून १५ वर्षे विभागप्रमुख, नगरसेवक आणि आमदारकी भूषविलेल्या विनोद घोसाळकरांची नियुक्ती करण्यामागे कोणते निकष वापरले, वारंवार त्यांच्यावरच पदांची खैरात का, असा सवाल पश्चिम उपनगरातील एका माजी विभागप्रमुखाने केला. काही महिन्यांपूर्वी घोसाळकर यांच्यावर शिवसेनेच्या महिला लोकप्रतिनिधींनी चारित्र्यहननाचे आरोप केले होते. त्यामुळे घोसाळकर यांच्याशिवाय म्हाडावर नियुक्तीसाठी मुंबईत एकही पदाधिकारी नव्हता काय, असा सवाल नाव न छापण्याच्या अटीवर एका ज्येष्ठ आमदाराने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार टीका करूनही महामंडळाची चाकरी कशाला स्वीकारायची, अशी प्रतिक्रिया शाखाशाखांमधील शिवसैनिक, शाखाप्रमुखांकडून ऐकायला मिळत आहे.

नित्याचीच औपचारिकता
निवडणुका जवळ आल्या की महामंडळांच्या नियुक्त्या करण्याची ही नित्याचीच औपचारिकता आहे. याआधी युती सरकार, आघाडी सरकारनेही अशाच प्रकारे अखेरच्या वर्षी महामंडळांवर नियुक्त्या केल्या होत्या. याही नियुक्त्या या औपचारिकतेचा भाग आहे.
-निलम गोर्‍हे , प्रवक्त्या, शिवसेना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -