घरCORONA UPDATECoronavirus Crisis: मास्क, ग्लोजच्या तुटवड्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम

Coronavirus Crisis: मास्क, ग्लोजच्या तुटवड्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम

Subscribe

होळीनंतर बदलणाऱ्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे, सारख्या साथीच्या आजारांमध्ये वाढ होण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच करोनाची लक्षणेही सारखीच असल्याने खासगी आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. मात्र हॉस्पिटलमध्ये मास्क, ग्लोज आणि गाऊन यासारखी आवश्यक साधने नसल्याने उपचार करताना डॉक्टरांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने (एमसीआयएम) अत्यावश्यक सुरक्षेची साधने हॉस्पिटलना तातडीने पुरवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाचा वाढत प्रभाव रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामधून वैद्यकीय सेवेला वगळण्यात आले असले तरी अत्यावश्यक प्राथमिक साधानांच्या अभावामुळे डॉक्टरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. होळीनंतर आपल्याकडे वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असल्याने सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे यासारखे साथीचे आजार पसरत असतात. त्यातच करोनासारखा जागतिक आजाराची लाट पसरली आहे. करोना आणि अन्य साथीच्या आजारांची लक्षणे सारखीच असल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण होऊन ते डॉक्टरांकडे धाव घेत आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे अनेक खासगी दवाखाने कर्मचाऱ्यांअभावी बंद आहेत, त्यामुळे नागरिक खासगी व सरकारी हॉस्पिटलमध्ये जात आहेत. बहुतांश हॉस्पिटलमध्ये मास्क, ग्लोज, गाऊन यासारखी अत्यावश्यक सुरक्षेची साधनेच उपलब्ध नाहीत. साथीच्या आजाराच्या रुग्णांमध्ये एखादा करोनाचा रुग्ण असल्यास मोठे संकट ओढवू शकते. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर, कर्मचारी यांची मोठी अडचण होत आहे. मूलभूत सोयीचा अभाव असल्याने काही डॉक्टरांनी सेवा बंद केली आहे. डॉक्टरांचे नियमन करणाऱ्या परिषदांनी देखील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेत आपात्कालीन परिस्थितीमध्ये ऑनलाईन औषध विवरणपत्र व चिकित्सा देण्यास परवानगी दिली आहे.

- Advertisement -

अपुरी साधने आणि संसर्गाच्या भीतीने कर्मचारी यायला तयार नसल्याने डॉक्टरांना दवाखाना चालवणे अवघड झाले आहे. त्यामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मास्क, ग्लोज आणि गाऊन सारखी प्राथमिक साधने उपलब्ध करून देण्यात यावी, कोणत्याही मोबदल्याशिवाय सरकारी हॉस्पिटलमध्ये सेवा देण्यास तयार झालेल्या खासगी डॉक्टरांची मदत घेण्यात यावी, अशी विनंती महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.

राज्यातील डॉक्टर्स सद्यस्थितीत रुग्णांना सेवा देण्याकरिता पूर्णपणे प्रयत्नशील आहेत, परंतु अत्यावश्यक प्राथमिक सुविधांच्या अभावामुळे ते वैद्यकीय सेवा प्रदान करण्यास असमर्थ ठरत आहेत. डॉक्टरांना येणाऱ्या अडचणींबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आवश्यक बाबींची परिपूर्ती करण्यासंबंधी मागणी केली. – डॉ. आशुतोष गुप्ता, अध्यक्ष – महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -