घरमुंबईउल्हासनगरात महापौर आणि उपमहापौरपदावरून मराठी-सिंधी वाद?

उल्हासनगरात महापौर आणि उपमहापौरपदावरून मराठी-सिंधी वाद?

Subscribe

नुकत्याच झालेल्या उल्हासनगर मनपाच्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत मराठी भाषिक विराजमान झाल्यामुळे आता सिंधी आणि बिगरसिंधी असा वाद निर्माण झाला आहे. आपसातील राजकीय मतभेदांमुळे सिंधी भाषिकांना महापौर आणि उपमहापौर या पदांना मुकावे लागले असल्याचे आरोप आता सिंधी नेते करीत असून ते यासाठी एकमेकांना जबाबदार ठरवत आहेत. सोशल मीडियावर देखील हा वाद रंगला असून त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या लिलाबाई आशान तर उपमहापौरपदी रिपाइंचे भगवान भालेराव निवडून आले आहेत. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या टीम ओमी कलानी पक्षाने शिवसेना, रिपाइं, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या बाजूने मतदान केल्यामुळे या निवडणुकीला वेगळी कलाटणी मिळाली. टीम ओमी कलानीचे (टीओके) सर्वेसर्वा ओमी कलानी यांनी चुकीची भूमिका घेतल्यामुळे महापौर आणि उपमहापौरपदापासून सिंधी भाषिकांना वंचित राहावे लागले, असा आरोप काही सिंधी भाषिक राजकीय नेते करू लागले आहेत.

सिंधी राजकीय नेत्यांचं वर्चस्व

उल्हासनगर शहरात सिंधी राजकीय नेत्यांचं अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे. आजवर उल्हासनगर विधानसभा मतदार संघातून केवळ सिंधी आमदारच निवडून आलेले आहेत. महापौर, उपमहापौरपद, विविध राजकीय पक्षांच्या शहर अध्यक्षपदी देखील सिंधी राजकीय नेत्यांचा दबदबा असतो. यंदा मात्र महापौर आणि उपमहापौरपद गमावल्यामुळे सिंधी भाषिकांमध्ये अस्वस्थता दिसून येत आहे.

- Advertisement -

भाजप शहर अध्यक्षपदासाठी उत्तर भारतीय नेत्याचा दावा

एकीकडे महापौर आणि उपमहापौरपदाचा वाद चिघळत जात असताना भाजपच्या शहर अध्यक्षासाठी संजय सिंग या स्थानिक उत्तर भारतीय नेत्याने दावा केला आहे. अनेक वर्षांपासून सिंधी नेत्यांनी हे पद उपभोगल्यामुळे आता बिगर सिंधी नेत्यांना शहर अध्यक्षपद मिळावे, अशी मागणी सिंग यांनी केली आहे.

कलानी कुटुंबीय हे अनेक वर्षांपासून विविध राजकीय पदे उपभोगत आहेत. सिंधी समाजाच्या समर्थनामुळे ते त्या पदांवर पोहचले आहेत. मात्र महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ओमी कलानी यांनी स्वार्थी भूमिका घेतल्यामुळे ही दोन्ही पदे सिंधी भाषिकांना गमवावी लागले आहेत.

प्रदीप रामचंदानी, नगरसेवक, भाजप

काही भाजप नेते हे भाषिक राजकारण करून शहरात तणाव निर्माण करत आहेत. ओमी कलानी यांनी कधीच राजकारणात भेदभाव केलेला नाही. राजकारणात सर्व धर्म समभाव असावा. विधानसभा निवडणुकीत भाजपने कलानी कुटुंबियांना तिकीट नाकारून जी फसवणूक केली, त्याचा वचपा आम्ही महापौर आणि उपमहापौर निवडणूकीत काढला.

कमलेश निकम, प्रवक्ते, टीओके

या शहरात गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या शहराध्यक्षपदी सिंधी भाषिकांचीच निवड होत आहे. बिगर सिंधी भाषिकांनी केवळ पोस्टर, बॅनर्स लावायचे, घोषणाबाजी करायची, रस्त्यावर उतरायचे, गुन्हे अंगावर घ्यायचे काय? त्यामुळे भाजपच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या उत्तर भारतीय नेत्याला शहराध्यक्षपद मिळावे अशी मी मागणी केली आहे.

संजय सिंग, भाजप नेते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -