घरमुंबईकाहीतरी गंभीर घडणार... मी शंका बोलून दाखवली होती

काहीतरी गंभीर घडणार… मी शंका बोलून दाखवली होती

Subscribe

तपास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सांगितल्या आठवणी

26 नोव्हेंबर 2008 तमाम मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवणारा दिवस. कुणाच्याही ध्यानीमनी नसतानाही अचानक आधुनिक शस्त्रे आणि दारूगोळ्यासह आलेल्या दहशतवाद्यांनी सीएसएमटी,हॉटेल ताज,हॉटेल ट्रायडंट आणि आजुबाजूच्या परिसरात अक्षरश : रक्तपात घडवला. सामान्य मुंबईकर यात मारला गेलाच पण पोलीस अधिकारी आणि संदीप उन्निकृष्णनसारखा एनएसजी कमांडो देखील यात धारातिर्थी पडला. 26 नोव्हेंबरला या काळरात्रीला आणि त्यानंतर चाललेल्या थैमानाला 10 वर्षे पूर्ण होतील. या काळरात्रीच्या त्यानंतरच्या संघर्षाच्या आणि हल्ल्याआधीच्या काही आठवणी माजी सहायक पोलीस आयुक्त आणि या हल्ल्याचे तपास अधिकारी अरूण चव्हाण यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितल्या. आयुष्यात कायम लक्षात राहणार्‍या या आठवणींबद्दल सांगताना चव्हाण सांगतात, २५ नोव्हेंबर २००८ ला मी दिल्लीला गेलो होतो. पण या दुर्दैवी घटनेआधी देशातील ठिकठिकाणांहून इंडियन मुझाहिद्दीनच्या २१ अतिरेक्यांना पकडण्यात आले होते. ज्यामध्ये पुणे, मध्यप्रदेश,इंदौर,बेंगलोर अशा ठिकाणांहून ही कारवाई करण्यात आली होती.

ऑगस्ट,सप्टेंबर,ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत सदर कारवाई करण्यात आली होती. यादरम्यान कपाडीया नावाचा एक अतिरेकी दिल्ली स्पेशल टिमने पकडला होता. या २१ जणांच्या अटकेनंतर दिल्लीत पकडलेल्या आरोपीकडून काही माहिती मिळेल असा विचार करून देवेन भारती यांनी दिलेल्या आदेशानुसार मी दिल्लीला रवाना झालो. दिल्लीहून रात्री ११ च्या सुमारास परत आल्यानंतर काहीतरी गंभीर घडणार अशी शंका मी बोलुन दाखवली आणि अखेर जे घडायला नको होते तेच घडलं.

- Advertisement -

हल्ल्याच्या रात्रीबद्दल सांगताना अरूण चव्हाण सांगतात २६/११ रोजी नेहमीप्रमाणे आम्ही कामावर आलो पण त्या दिवशी असे काही होणार याची जराही कल्पना नव्हती. रात्री ८ पर्यंत सर्व काही शांत होते. मी घरी जायला निघालो. साडेआठ वाजण्याच्या सुमारास मी वडाळ्याच्या पुढे पोहोचलो होतो. त्यावेळी सहआयुक्त देवेन भारती यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला माघारी कामावर यायला सांगितले. या फोनमुळे नक्कीच काहीतरी गंभीर घडले आहे असा संशय मला आला होता. त्यानुसार मी गाडी वळवली आणि पुन्हा माघारी फिरलो. वाटेत येते वेळीच पोलीस सहकार्‍यांच्या गाड्या तुफान वेगाने रस्त्यावरुन जात होत्या. ज्यावेळी मी भारती सरांच्या ऑफिसमध्ये पोहोचलो त्यावेळी मुंबईत ताज हॉटेलमध्ये गोळीबार सुरू असल्याची खबर मिळाली. कामा हॉस्पीटलच्या परिसरात आणि आतसुद्धा गोळीबार होत होता म्हणून मिळालेल्या आदेशाप्रमाणे तयारी करून आम्ही लागलीच हॉस्पीटलच्या इमारतीजवळ पोहोचलो होतो.

पण कामाच्या इमारतीत अतिरेकी असल्याने एखादी समांतर इमारत शोधूनआम्हाला गोळीबार करता येईल म्हणून अंजुमन शाळेच्या इमारतीत शिरलो होतो. एक पथक इमारतीच्या खालीच थांबले होते. त्यामध्ये विजय साळसकर यांचाही समावेश होता. विजय साळसकर त्यावेळी जर आमच्यासोबत आले असते तर कदाचित ते वाचले असते. मुंबईत एकूण दहा ठिकाणी हल्ल्याची माहिती मिळत होती. तब्बल तीन दिवस मुंबईत हे भयंकर वातावरण होते. अखेर २८ नोव्हेंबरच्या रात्री या परिस्थीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

- Advertisement -

असा झाला तपास

या घटनेनंतर या प्रकरणाचा कसून तपास सुरू झाला. कफ परेडच्या बधवार पार्कजवळ जिथे कसाब आणि त्याचे साथीदार होडीच्या साहाय्याने उतरले होते तिथे आमचे पथक पोहोचले यामध्ये मी स्वत:सुद्धा होतो. ज्या होडीतून ते आले होते.त्यातून एकूण ४३ वस्तू आम्ही हस्तगत केल्या यातल्या बर्‍याचशा गोष्टी त्या मच्छीमारांच्या होत्या. या वस्तूंमधल्या काही गोष्टींमधून मिळालेल्या गोष्टींची आम्ही डीएनएची चाचणी केली. त्यावरून हे स्पष्ट झाले. पण होडीत एक जीपीएस ट्रॅकर मिळाले होते.ज्याच्या आधारे बरीचशी माहिती आम्हाला मिळाली होती. होडीत मिळालेले जीपीएस ट्रॅकर,सॅटेलाईट फोन आणि इतर तपासाच्या अनुषंगाने मी,भायखळा पोलीस ठाण्याचे सध्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम आणि सहआयुक्त देवेन भारती हे अमेरिकेला गेलो. अमेरीकेच्या वॉशिंग्टन मध्ये राहून आम्ही तिथल्या एफबीआयची मदत घेतली आणि त्यानंतर हे जीपीएस डिव्हाईस पाकिस्तानमधील कराची मधून आले असल्याचा भक्कम पुरावा आमच्या हाती लागला. याच पुराव्याच्या आधारावर हे अतिरेकी पाकिस्तानातून आले असल्याचे आम्ही कोेर्टात सिद्ध केले होते,असे तपासबद्दल सांगताना चव्हाण म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -