घरमुंबईएसटी बस कारखाने बंद होण्याच्या मार्गावर

एसटी बस कारखाने बंद होण्याच्या मार्गावर

Subscribe

महामंडळाचे दुर्लक्ष झाल्याचा कर्मचार्‍यांचा आरोप

राज्यातील खेड्यापाड्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाची जीवनवाहिनी समजल्या जाणार्‍या एसटी महामंडळाने दुर्लक्ष केल्यामुळे बसेसची बांधणी होत असलेले तीन कारखाने शेवटच्या घटका मोजत आहेत. महामंडळाच्या या तीन कारखान्यांमध्ये आजवर अनेक बसेस बनवण्यात आल्या. यातून हजारोंच्या संख्येने राज्यात रोजगार निर्माण झाले. तसेच बसेस बनवण्याचा खर्चही मर्यादेत झाला.

मात्र महामंडळाला आता खासगी कारखान्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. त्यात एसटी महामंडळ टिकत नसल्याने बसेस बांधणीसाठी येणारा खर्च वाढत आहे. त्यामुळे एसटी महामंडळ खासगी कंपन्यांकडून बसेसची बांधणी करून घेत आहे. त्यामुळे एसटी कारखान्यांमधील रोजगारही कमी झाला आहे. एसटी महामंडळाच्या बहुतेक बसेस पुणे येथील दापोली, औरंगाबाद येथील चिकलठाणा आणि नागपूर कार्यशाळेत बांधण्यात येतात. सार्वजनिक वाहतुकीतील महाराष्ट्र राज्य परिवहन हे देशातले एकमेव महामंडळ आहे. इतिहासात वाहतूक विभागात महामंडळाचे मोठे योगदान आहे. मात्र आज एसटी महामंडळाच्या उदासीन धोरणामुळे एसटीचे कारखाने अखेरच्या घटका मोजत आहेत. पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने बांधण्यात येणार्‍या एसटीगाड्यांचे बाह्य स्वरूप बदलण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. अ‍ॅल्युमिनियमच्या धाटणीतील बसऐवजी सर्व बसची बांधणी स्टीलमध्ये करणे सुरू आहे.

- Advertisement -

एसटीच्या बसची बाह्यबांधणी अ‍ॅल्युमिनियमची आहे. मात्र आता महामंडळाने एसटीची बांधणी स्टीलची केल्यामुळे कारखान्यात काम करणार्‍या कर्मचार्‍यांना त्याचा अनुभव नाही. सोबतच त्या पद्धतीचे एसटीचे कारखाने तंत्राने आधुनिकसुद्धा नाहीत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या स्वतःच्या कारखान्यातून बसेस बांधणीचे प्रमाण खूप कमी झाले आहे. सोबतच शिवशाहीसारख्या वातानुकूलित बसेस खासगी कंपन्यांकडून तयार करून घेतल्या जात आहे. त्यांच्यामुळे एसटी महामंडळ कर्मचार्‍यांचा रोजगार संपविण्याच्या मार्गावर वाटचाल करीत आहे, असा आरोप एसटी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, महिन्याला तीनही कारखान्यात मिळून १०० बसगाड्यांची बांधणी केली जाते. तसेच वार्षिक एकूण १ हजार २०० बसगाड्या तयार होत आहेत. आज एक साधी एसटी बांधण्यासाठी महामंडळाला १२.५० लाख ते १३ लाखांदरम्यान खर्च येतो. मात्र याच बसेस खासगी कंपनीकडून घेतल्या तर यांची किंमत फार कमी होते. सोबतच वेळेवर काम पूर्ण करून मिळते. त्यामुळे आता एसटी महामंडळ खासगी कंपनीकडून बसेस बांधून घेत आहे.

एसटीचे तीनही कारखाने लवकरच होणार बंद
राज्यात एसटी महामंडळाच्या बसबांधणीचे तीन कारखाने आहेत. औरंगाबाद, नागपूर व पुणे येथे हे कारखाने आहेत. या कारखान्यांतील कामगारांना काम नाही, भाड्याने घेतलेल्या गाड्यांपेक्षा चांगल्या गाड्या या कारखान्यात बांधल्या जातील, असा कर्मचार्‍यांना विश्वास होता. पण याकडे दुर्लक्ष करून भाड्याने गाड्या घेतल्या गेल्या आहेत. हा व्यवहार करतानाच कर्मचारी संघटनेने त्याला विरोध केला होता. तरीसुद्धा एसटी महामंडळाने कर्मचार्‍यांच्या मागण्या डावलून घेतलेल्या या गाड्या आता डोईजड होत असल्याचे वास्तव आहे. आज या तिन्ही कारखान्यात एकूण केवळ १२५० कर्मचारी उरले आहेत. एसटी महामंडळ आपल्या कारखान्यांना अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न करत नाही. सोबतच कित्येक वर्षांपासून एसटीच्या कार्यशाळेत कर्मचार्‍यांची नियुक्ती केली गेली नाही. त्यामुळे एसटी महामंडळ आपले कारखाने बंद करण्याच्या मार्गावर आहे.

- Advertisement -

नव्या ७०० बसेस सुद्धा खासगी कंपनी बांधणार                                                                           गेली तीन वर्षे नवीन बसेसची खरेदी न करता केवळ जुन्या बसेसचे सांगाडे बदलून त्या पुन्हा वापरण्यात येत होत्या. एसटीच्या या धोरणावर सातत्याने टीका होत असताना आता राज्य सरकारकडून निधी मिळाला आहे. या निधीतून एसटीने तब्बल सातशे नवीन बसेस बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या तब्बल 700 बसेस खरेदी करण्याची निविदा नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या निविदेत तीन प्रकारच्या बस बांधणीसाठी विहित तांत्रिक मुद्याच्या आधारे सांगाडे (चेसिस) मागविण्यात आले होते. या बसेस एसटी कारखान्यात बांधण्याचा निर्णय झालं होता. मात्र एसटी आता या ७०० चेसिसवर एसटीचे सांगळे बांधणीसाठी खासगी कारख्या देण्याच्या निर्णय घेतला आहे. त्या संबंधित एसटी एक जाहिरात सुद्धा प्रकशित केली आहेत.

=================
कर्मचारी संख्या
दापोली = ६००
औरंगाबाद= ४००
नागपूर = २५०
===================

एसटीची व्यवस्था
19,020 – ताफ्यातील बसेस
3,000 – दरवर्षी होणार्‍या मुदतबाह्य बसेस
9,130 – फेरवापरातील तीन वर्षांतील बसेस
10,500 कोटी रु. दुरुस्तीसाठी दरवर्षीचा खर्च

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -