घरमुंबईरिक्त पदांमुळे कोरोनामध्ये आरोग्य सेवेवर ताण - प्रजा फाऊंडेशन

रिक्त पदांमुळे कोरोनामध्ये आरोग्य सेवेवर ताण – प्रजा फाऊंडेशन

Subscribe

मुंबई महापालिकेची विविध रुग्णालयांमधील वैद्यकीय कर्मचार्‍यांची ४७ टक्के आणि पॅरामेडिकलची ४३ टक्के पदे रिक्त आहेत. हे प्रमाण एकूण पदांच्या तुलनेत ३० टक्के इतके आहे.

मुंबई महापालिकेने पदभरतीकडे केलेल्या दुर्लक्षाचा फटका कोरोनाच्या आपत्तीकाळात आरोग्य सेवेवर झाल्याचा आरोप प्रजा फाऊंडेशनच्या अहवालामध्ये करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेची विविध रुग्णालयांमधील वैद्यकीय कर्मचार्‍यांची ४७ टक्के आणि पॅरामेडिकलची ४३ टक्के पदे रिक्त आहेत. हे प्रमाण एकूण पदांच्या तुलनेत ३० टक्के इतके आहे. पालिकेच्या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.

कोरोनामध्ये मुंबई महापालिकेची प्रमुख रुग्णालयाने आणि पेरीफेरीयल रुग्णालयांमध्ये कोरोनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र वाढती रुग्ण संख्या आणि हॉस्पिटलमधील कर्मचार्‍यांचा तुटवडा याचा मोठा फटका रुग्णसेवेला बसला. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ८८१ वैद्यकीय पदे मंजूर असून, त्यातील फक्त ३३७ पदेच भरण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पॅरामेडिकलची २६९६ मंजूर पदे असून, १५०२ पदे भरली आहेत. नर्सिंग स्टाफ ५४११ पैकी ४७०७ पदे भरली आहेत. रुग्णालयांमधील ८९६७ कर्मचार्‍यांची पदे मंजूर असून, फक्त ६१२४ पदेच भरण्यात आली आहे. पालिकेच्या रुग्णालयातील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असतानाच पालिकेच्या डिस्पेन्सरीमध्येही कर्मचार्‍यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. डिस्पन्सेरीमध्ये ७७९ वैद्यकीय पदांपैकी ५४८ पदे भरली आहेत. त्याचप्रमाणे पॅरामेडिकलच्या ८८४ पैकी ५४३, नर्सिंग स्टाफ १८९५ पैकी १४०३ पदे भरली आहेत. तसेच ५८४२ कर्मचार्‍यांच्या पदांपैकी ४०१३ पदेच भरली आहेत. पालिकेचे रुग्णालये आणि डिस्पेन्सरी अशा दोन्हीमध्ये २१ हजार ३८ पदांपैकी १४ हजार ६४५ पदेच भरलेली आहेत. रिक्त असलेले पदांचे प्रमाण हे एकूण पदांच्या तुलनेत ३० टक्के इतके आहे. २०३० पर्यंत एक लाख व्यक्तींमागे ५५० वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफ उपलब्ध असणे आवश्यक आहे. मात्र सध्या मुंबईमध्ये हे प्रमाण ७३ वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफ इतके आहे. इतक्या कमी प्रमाणात असलेल्या कर्मचार्‍यांच्या संख्येमुळे कोरोनासारख्या जागतिक महामारीचा सामना करताना आरोग्य सेवेवर प्रचंड ताण पडल्याचे अहवालात म्हटले आहे.

- Advertisement -

कोविड-१९ या महामारीने देशांतर्गत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या स्थितीकडे सार्‍या जगाचे लक्ष वेधले आहे. या महामारीमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा दबाव वाढला. या पार्श्वभूमीवर पायाभूत संचरना आणि देखरेख व्यवस्थेमध्ये सुधारणा करून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे प्रजा फाऊंडेशनने मंगळवारी जाहीर केलेल्या ‘मुंबईतील आरोग्याची सद्यस्थिती’ या अहवालातून अधोरेखित केली आहे. अक्षम पायाभूत संरचना, अपुरे मनुष्यबळ आणि बजेटचा अप्रभावी वापर ही आरोग्य व्यवस्थेची स्थिती असल्याने नागरिकांना एरवी भेडसावणार्‍या रोगांचा उपचार व्यवस्थाही सुरळीत चालण्यामध्ये अडचणी येत असल्याचे मत प्रजा फाऊंडेशनचे विश्वस्त निताई मेहता यांनी मांडले.

आरोग्यावरील निधीचा वापरच नाही

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भांडवली खर्चाच्या बजेटचा वापर काही वर्षांपासून सातत्याने कमी होत राहिला आहे. २०१६-१७ मध्ये बजेटमध्ये तरतूद केलेल्या निधीपैकी ७३ टक्के रक्कम वापरली नव्हती. हेच प्रमाण २०१८-१९ मध्ये ५४ टक्के इतके होते, अशी माहिती प्रजा फाऊंडेशनचे संचालक मिलिंद म्हस्के यांनी दिली.

- Advertisement -

कोविडपेक्षा अन्य आजारांने अधिक मृत्यू

कोविडकाळात अनेक रुग्णांचा मृत्यू अन्य आजाराने झाला आहे. मार्च ते जुलैदरम्यान ४४,८८७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मे महिन्यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक १३,८३३ मृत्यू झाले. त्यापैकी कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ९५७ आहे. तर मे २०१९ मध्ये ६,८३२ मृत्यू झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ६,०४४ अधिक मृत्यू झाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -