घरमनोरंजनमहेश भट्टसह करण जोहरच्या मॅनेजरची चौकशी होणार

महेश भट्टसह करण जोहरच्या मॅनेजरची चौकशी होणार

Subscribe

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण,गरज पडल्यास करण जोहरला चौकशीसाठी बोलाविणार

सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक महेश भट्ट आणि निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या मॅनेजरची सोमवारी चौकशी होणार आहे. या दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स वांद्रे पोलिसांकडून बजाविण्यात आले आहे. गरज पडल्यास करण जोहर याचीही पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या वृत्ताला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला आहे. सिनेअभिनेत्री कंगणा राणौत हिच्या आरोपानंतर वांद्रे पोलिसांनी ही चौकशी सुरू केल्याचे बोलले जाते.

14 जूनला सुशांतने त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. या आत्महत्येचा तपास सध्या वांद्रे पोलिसांकडून सुरु आहे. आतापर्यंतच्या चौकशीत सुशांतने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. मात्र त्याला कुठले नैराश्य होते, त्याला स्वत:च्या जिवाची भीती वाटत होती, आपले करिअर संपणार, मला कोणीतरी मारणार आहे असे त्याला नेहमीच भीती वाटत होती. त्याला नक्की कोणाची भीती वाटत होती, करिअरच्या सुरुवातीला चांगले चित्रपट मिळत असताना तो अचानक नैराश्यात का गेला. त्याच्या आत्महत्येमागे बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजी कारणीभूत आहे का याचा आता पोलिसांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे आता बॉलिवूडशी संबंधित प्रत्येकाची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

- Advertisement -

संजय लिला भन्साली, रुमी जाफरी, आदित्य चोप्रा यांच्यानंतर पोलिसांनी कंगणा राणौत हिला चौकशीसाठी समन्स पाठविले आहे. मात्र कंगणा ही सध्या मनाली येथे वास्तव्यास आहे, तिला मुंबईत येणे शक्य नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगणाने काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करताना महेश भट्ट, करण जौहरसह इतर काही निर्माता-दिग्दर्शक, कलाकारांवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्यावर गटबाजीसह घराणेशाहीचा आरोप करुन तिने एकच खळबळ उडवून दिली होती. या आरोपींची गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे कंगणाने आरोप केलेल्या प्रत्येकाला चौकशीसाठी बोलवा, त्यांची जबानी नोंदवून घ्या, असे आदेशच गृहमंत्र्यांनी पोलीस दलाला दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वांद्रे पोलिसांनी महेश भट्ट यांच्यासह करण जौहरच्या मॅनेजरला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले आहे.

सोमवारी या दोघांची वांद्रे पोलीस ठाण्यात चौकशी होण्याची शक्यता आहे. या दोघांच्या चौकशीनंतर गरज पडल्यास करण जौहर याचीही पोलिसांकडून चौकशी होऊ शकते, असेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आता पोलिसांनी 40 हून अधिक लोकांची पोलिसांनी जबानी नोंदविली आहे. त्यात सुशांतचा स्वयंपाकी निरज सिंग, घरगडी केशव बच्चानार, मॅनेजर दीपेश सावंत, क्रिएटिव्ह मॅनेजर सिद्धार्थ राममूर्ती पिठानी, बहीण नितू सिंग, मितू सिंग, वडील के. के सिंग, अभिनेता महेश शेट्टी, कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा, व्यावसायिक मॅनेजर श्रृती मोदी, पीआर मॅनेजर अंकिता तेहलानी, अभिनेत्री रिया चक्रवर्ती, सिनेदिग्दर्शक संजय लिला भन्साळी, लेखक आणि दिग्दर्शक रुमी जाफरी, यशराज फिल्मचे अध्यक्ष आणि निर्माता आदित्य चोपडा, तीन पत्रकार, तीन मनोचिकित्सकासह एका मानसशास्त्रज्ञाचा समावेश आहे. आगामी काळात इतर काहींची चौकशी होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

त्यात एका बड्या सिनेअभिनेत्याचा समावेश आहे. या अभिनेत्यासोबत सुशांतचे वाद झाले होते, त्यातून त्याने सुशांतला बघून घेण्याची धमकी दिली होती. मात्र याविषयी पोलिसांनी काहीही सांगण्यास नकार दिला. अद्याप तपास सुरू आहे, चौकशीअंतीच या आत्महत्येबाबत अधिक माहिती पत्रकारांना दिली जाईल, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -