घरदेश-विदेशअनलॉक-३ मध्ये सिनेमागृह, जिम सुरू होणार?

अनलॉक-३ मध्ये सिनेमागृह, जिम सुरू होणार?

Subscribe

केंद्रीय गृहमंत्रालयाकडे प्रस्ताव दाखल

अनलॉकच्या तिसर्‍या टप्प्यात देशभरातील सिनेमागृह, जिम पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘कोविड 19’ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेला ‘अनलॉक 2’ येत्या शुक्रवारी संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार पुढील टप्प्यात आणखी काही निर्बंध शिथिल करण्याच्या विचारात आहे. ऑगस्टपासून अंमलात आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सिनेमा हॉल 1 ऑगस्टपासून पुन्हा सुरु करण्याबाबत केंद्र सरकार विचार करत असल्याचे बोलले जाते. सोशल डिस्टन्सिंगसारख्या नियमांचे पालन करुन काही नियमावली यासाठी आखली जाऊ शकते. माहिती व प्रसारण मंत्रालयाने सिनेमा हॉल पुन्हा सुरु करण्याचा प्रस्ताव गृह मंत्रालयाकडे दिला आहे. हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी त्यांनी प्रमुख सिनेमागृहांच्या मालकांशी चर्चा केली होती.

- Advertisement -

थिएटर मालक 50 टक्के आसन क्षमतेसह थिएटर पुन्हा सुरू करण्याच्या बाजूने आहेत. मात्र केंद्रीय मंत्रालयाने सुरुवातीला 25 टक्के क्षमतेसह थिएटर सुरू करण्याचे आणि सर्व नियम पाळण्याचे सुचवले आहे. दुसरीकडे, व्यायामशाळा आणि जिम पुन्हा सुरु करण्याची मागणीही जोर धरत आहे. त्यामुळे केंद्र सरकार काही निर्बंधांसह जिम पुन्हा उघडण्यास सशर्त परवानगी देण्याच्या तयारीत आहे.

‘अनलॉक 3’ मध्ये काही निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. शाळा आणि मेट्रो सेवा देशभरात बंद राहण्याची शक्यता आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शालेय शिक्षण सचिव अनिता करवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत राज्यांशी सल्लामसलत केली. मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी शाळा पुन्हा सुरु करण्याबाबत यापूर्वी पालकांकडून अभिप्राय घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर, पालक शाळा पुन्हा सुरु करण्याच्या पक्षात नाहीत, असे मंत्रालयाने म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -