घरमुंबईपावसाची संततधार सुरूच...

पावसाची संततधार सुरूच…

Subscribe

डोळखांब जवळच्या 40 गावांचा संपर्क तुटला , शाई नदीवरील कांबा, बेलवली पूल पाण्याखाली

सतत सुरू असलेल्या पावसाने शाई नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. साकुर्ली-कांबा रस्त्यावर असलेला गावातील पूल आणि टेम्भूर्ली-बेलवली रस्त्यावर असणारा पूल हे दोन्ही पूल पाण्याखाली गेल्याने एकूण 40 गावांचा संपर्क तुटला आहे.

या गावात जाण्यासाठी हे एकमेव पूल होते. प्रशासनाने या ठिकाणी आपत्कालिन यंत्रणा सज्ज ठेवली नसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने शहापूर, डोळखांब शहरासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

- Advertisement -

आतापर्यंत शहापूर तालुक्यात एकूण पावसाची नोंद 1 जूनपासून 11 जुलै पर्यंत 1076 मिलिमीटर झाली आहे. तर गुरुवारपासून सुरू असलेल्या पावसाची 112 मिमी नोंद झाली आहे. आजोबा पर्वताच्या पायथ्यापासून येणार्‍या, दुर्गम परिसरातून वाहणार्‍या शाई नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. नदीवर असलेल्या दोन्ही पुलावरून सकाळपासून पाणी असल्याने 40 गावांचा संपर्क तुटलेला आहे. हे दोन्ही पूल 60 ते 70 वर्ष जुने आहेत.

वर्ष 2016 ला साकुर्ली- कांबा पुलाची उंची वाढविण्यासाठी नाबार्ड मधून 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. तसा प्रस्तावही सार्वजनिक बांधकाम विभागाने पाठवला होता. परंतु याचा पाठपुरावा अद्यापही झाला नसल्याने ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. तर मागील वर्षी बेलवली पुलाची मागणीही ग्रामस्थांनी केली होती. परंतु शासनाने अजूनही या दोन्ही पुलांना निधी उपलब्ध करून दिला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -