घरमहाराष्ट्रअकरावीची पहिली यादी नव्वदी पार

अकरावीची पहिली यादी नव्वदी पार

Subscribe

एसएससी बोर्डाचा घसरलेला निकाल, अन्य बोर्डामधील गुणवंताची वाढलेली संख्या यामुळे अनेक नामांकित कॉलेजमधील अकरावी प्रवेशची पहिली यादी नव्वदी पारच राहिली. सायन्स शाखेची 93 तर कॉमर्स शाखेची 92 टक्के कट ऑफ जाहीर झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत काही कॉलेजांची कट ऑफ एक ते दोन टक्क्यांनी कमी झाली तर काही कॉलेजांची कट ऑफमध्ये वाढ झाली आहे. पहिली यादी नव्वदीपार राहिल्याने दुसर्‍या यादीमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाली. अकरावी प्रवेशासाठी मुंबई विभागातून तब्बल १ लाख ८५ हजार ३१८ विद्यार्थ्यांपैकी एकूण १ लाख ३४ हजार ४६७ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश देण्यात आले आहेत. पहिल्या पसंतीचे कॉलेज ४८ हजार ८७२ विद्यार्थ्यांना मिळाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील. दुसर्‍या पंसतीक्रमाचे कॉलेज 22 हजार 457 विद्यार्थ्यांना मिळाले आहेत. यातील काही विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील. तर काही विद्यार्थी पुढच्या यादीची वाट पाहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

राज्य मंडळाचा निकाल यंदा कमी झाल्यामुळे तसेच केंद्रीय विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्याने पहिल्या यादीत टक्केवारी वाढेल अशी शक्यता होती. मात्र गतवर्षीच्या तुलनेत कटऑफमध्ये फारसा परिणाम झालेला नाही. काही कॉलेजमधील कटऑफ ९० ते ९४ टक्यांवर पोहचली आहे. तर अनेक कॉलेजमधील कटऑफ ८० ते ८५ वरच स्थिरावल्या असल्याचे दिसून येते. आर्ट्स आणि कॉमर्स शाखेच्या अभ्यासक्रमांची कट ऑफ वाढली असल्याने नामवंत महाविद्यालयातील पहिल्या यादीत ८० टक्के जागा पहिल्या यादीत भरल्या जाण्याची शक्यता आहे.

एसईबीसी, ईडब्ल्यूएसच्या जागा राहणार रिक्त
अकरावी प्रवेशामध्ये एसईबीसीसाठी मुंबई विभागामध्ये राखीव असलेल्या 15 हजार 531 जागांसाठी चार हजार 726 अर्ज आले होते. त्यापैकी फक्त तीन हजार 287 विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला. त्याचप्रमाणे ईडब्ल्यूएस मुंबई विभागातून 12 हजार 923 जागांसाठी 796 अर्ज आले होते. त्यातील 597 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. त्यामुळे यावर्षी एसईबीसी व ईडब्ल्यूएसच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -