घरमुंबई'मेहतांना सतत क्लिन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पितळ पडले उघडे'

‘मेहतांना सतत क्लिन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पितळ पडले उघडे’

Subscribe

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप; मेहतांच्या अडचणीत वाढ होणार?

एमपी मिल कंपाउंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या भूमिकेवर लोकायुक्तांनी ताशेरे ओढल्याचे वृत्त प्रकशित झाल्यानंतर आता विरोधकांकडून देखील जोरदार टीका होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तर आता यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत प्रकाश मेहतांना क्लिन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पितळ उघडे पडल्याची जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी एम. पी. मिल कंपाऊंड प्रकरणी प्रकाश महेता यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली.

काय म्हणाले धनंजय मुंडे  

ताडदेव मिल कंपाउंड घोटाळ्यात गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत विरोधी पक्षाने सभागृहात केलेल्या आरोपांवर माननीय लोकयुक्तांनी शिक्कामोर्तब केले. एव्हढचं नाही तर मंत्री म्हणून त्यांनी आपली जबाबदारी निष्पक्षपणे पार पाडली नाही, असे गंभीर आक्षेप नोंदवल्याचे धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणत सतत क्लीन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पितळ देखील उघडे पडल्याची टीका केली. तसेच आता तरी किमान जनाची नाही तर मनाची लाज ठेऊन मेहतांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा स्विकारावा, असे धनंजय मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

- Advertisement -

अन्यथा कामकाज चालू देणार नाही 

येत्या १७ जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असून जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला नाही तर कामकाज चालू देणार नाही, असा इशारा धनंजय मुंडे यांनी यावेळी दिला. तसेच हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे, भ्रष्टचाराचे थैमान घालणाऱ्या १६ मंत्र्यांच्या गैरकारभारातील सत्य हळूहळू बाहेर येणार असल्याचे सांगत, ‘सत्य परेशान हो सकता है पराजित नही’, अशी काव्यात्मक टीका देखील मुंडेंनी यावेळी केली.

- Advertisement -

आरोपांवर काय म्हणाले प्रकाश मेहता

‘अहवालात ठपका ठेवलायं, असं कुणी सांगितलंय, ठपका ठेवलाय असा अहवाल कुठे आहे. तुम्हाला ही जी बातमी मिळाली ती बातमीच मला मिळालेली आहे. त्यामुळे असा काही अहवाल आलाय लोकायुक्तांचा अहवाल आलाय या संबंधी माझ्याकडे कुठलीही माहिती नाही. शासनाकडे आलाय आणि शासनाने मला कळवलंय असही काही नाही.’

काय आहे नेमकं प्रकरण  

मुंबईतील ताडदेव येथील एम.पी. मिल कंपाऊंड एसआरए घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहता दोषी असल्याचा ठपका न्यायमुर्ती एम. एल. ताहलीयानी आपल्या चौकशी अहवालात ठेवला आहे. तसेच एम. पी. मिल कंपाऊंड एसआरए प्रकल्पाला मंजुरी देताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा प्रकाश मेहता यांनी या प्रकरणाच्या फाईलवर मारला होता. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना अवगतच केले नसल्याचे आता चौकशीत समोर आले आहे. तसेच त्यांनी आपली जबाबदारी देखील निष्पक्ष पार पाडल्याचा ठपका लोकायुक्तांनी चौकशी अहवालात ठेवला आहे.

आता तरी भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचं सोडा – जयंत पाटील

फडणवीस मंत्रीमंडळातील इतर मंत्र्यांची अशीच निःपक्षपाती चौकशी होणार का? आणि दोषी आढळल्यानंतर आता तरी मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करायचे सोडून प्रकाश मेहतांचा राजीनामा घेणार का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. एसआरए घोटाळ्यात प्रकाश मेहता दोषी असल्याचा अहवाल लोकायुक्तांनी दिला आहे. त्यावर बोलताना प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी हा सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी आधीच मेहतांना क्लीन चिट दिली होती. मात्र चौकशीमुळे सत्य समोर आले आहे. एसआरए घोटाळ्याच्या चौकशीची मागणी वारंवार विधानसभेत लावून धरली असल्याचेही प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. अखेर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. आज चौकशीनंतर घोटाळा उघडकीस आला, असेही आमदार जयंत पाटील म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -