घरमुंबईरात्री उशिरापर्यंत इलेक्शन ड्युटीमुळे शिक्षक संतापले

रात्री उशिरापर्यंत इलेक्शन ड्युटीमुळे शिक्षक संतापले

Subscribe

 मतदानाच्या दुसर्‍या दिवसाची सुट्टी निवडणूक आयोगाकडून नाकारली जाणे, तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी रात्री दोन वाजेपर्यंत इलेक्शन ड्युटी सुरू असणे, या कारणामुळे शिक्षक प्रचंड संतापले होते. रात्री उशिरापर्यंत काम चालल्याने शिक्षिका व अन्य महिला कर्मचार्‍यांना घरी जाताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. काही जणांनी रेल्वे स्थानकावरच रात्र काढली. या सर्व कारणांमुळे शिक्षिकांसह महिला कर्मचार्‍यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शिक्षिकांना ड्यूटी देताना शाळेपासून 10 किलोमीटरवर द्यावी, अशा आयोगाच्या साधारण सूचना आहेत. असे असतानाही महिला शिक्षकांना घरापासून 40 ते 50 किलोमीटरवर दुर्गम भागात ड्युटी देण्यात आली. ही बाब यंत्रणेच्या लक्षात आणून दिल्यानंतरही आमची चूक असली तरी ड्यूटी करायला लागेल, अशी भूमिका आयोगाकडून घेण्यात आली. त्यामुळे सर्वच शिक्षकांना नाइलाजाने ड्यूटी करावी लागली. कोणतीही सुरक्षिततेची हमी नाही, अनोळखी जागी मुक्कामाची सोय नाही, स्वच्छतागृह, आंघोळीची सोय नाही अशा तक्रारी शिक्षिकांकडून करण्यात आल्या.

- Advertisement -

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बूथवरील कर्मचार्‍यांना मतदानाच्या साहित्यामुळे शाळेत मुक्काम करायला लागतो. याची तजवीज यंत्रणेने केली नव्हती. इतक्या निवडणुका झाल्या मात्र यावेळेची इलेक्शन ड्युटी सर्वात जास्त त्रासदायक, गैरसोयीची आणि चीड आणणारी होती, अशा तक्रारी शिक्षकांनी दिल्याचे शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे म्हणाले.

मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत मतदान यंत्र जमा करून घेतले नाही. झोनल अधिकार्‍यांकडून मेहनताना देताना अडचणी आल्या. यंत्र बंद झाल्याने ती वेळ कव्हर करण्यासाठी ताटकळत बसावे लागले. राहत्या ठिकाणापासून अगोदरच लांबच्या ठिकाणी ड्युटी दिल्या होत्या. त्यामुळे सकाळी 3 वाजता घरी पोहचावे लागले. अनेक शाळात निकालाचे वेळापत्रक मंगळवारी होती. शिक्षक उशिरा पोहचल्याने निकाल वेळापत्रक कोलमडले असेही दराडे यांनी सांगितले.

- Advertisement -

निवडणुकीनंतर शिक्षकांना रात्री उशीरापर्यंत ईव्हीएम मशीन जमा करून घरी जाण्यासाठी रात्रीचे दोन वाजले. यामध्ये विरार, कल्याण, अंबरनाथ येथील शिक्षकांची संख्या अधिक होती. शिक्षकांना घरी जाण्यासाठी निवडणूक आयोगाकडून कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्याचा त्रास महिलांना अधिक सहन करावा लागला. तसेच कामाच्या तुलनेत मेहतानाही फार कमी व मतदान केंद्रांच्या जागेवर असलेल्या असुविधांचा फटका महिलांना बसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाल्याची माहिती टीचर्स डेमोक्रेटीक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -