घरमुंबईठाणे शहरात हरवली वड-छाया, फांद्या जगवण्याचे पर्यावरण प्रेमींचे आवाहन

ठाणे शहरात हरवली वड-छाया, फांद्या जगवण्याचे पर्यावरण प्रेमींचे आवाहन

Subscribe

आज वटपौर्णिमा आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वडासारखी झाडे दुर्लभ झाली असून वटपौर्णिमेला पुजनासाठी झाड शोधणे सौभाग्यवतींसाठी अवघड गोष्ट झाली बनली आहे. त्यानिमित्य शहरातील झाडे वाचवण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे.

निसर्गाचे काही तरी देण लागतो, यादृष्टीने भारतीय संस्कृतित प्राणी, पक्षी, झाडे, वेली यांना वेगळे स्थान दिले आहे. पण निसर्गावरील मानवी आक्रमणामुळे जैवसाखळीच धोक्यात आली आहे. शहरीकरणामुळे वडासारखी झाडे दुर्लभ झाली असून वटपौर्णिमेला पुजनासाठी झाड शोधणे सौभाग्यवतींसाठी अवघड गोष्ट झाली बनली आहे. आरोग्याच्यादृष्टीने हे झाड बहुमूल्य असून त्याची पाने, फळे, फांद्या, पारंब्यांचा आयुर्वेदात मोठा उपयोग सांगितला आहे. धुळीकणांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी उपयुक्त ठरणारे हे झाड प्रदुषित हवा शुद्ध करणाचे मोलाचे काम करते. वटपौर्णिमेच्या दिवशी घरात पुजल्या जाणाऱ्या वडाच्या फांद्या कचराकुंडीत न टाकता, त्या कुंडीत लावून जगवण्याचे आवाहन पर्यावरण प्रेमींनी केले आहे.

वृक्षांच्या कवेतील शहर

ठाणे शहर तलावांचे शहर म्हणून ओळखले जात असले तरी फार पूर्वी ठाण्याची ओळख वड, पिंपळ अशा मोठ्या वृक्षांच्या कवेतील शहर, अशी होती. मात्र वाढते औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे ही झाडे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. विशेष करुन वडाच्या झाडाची कत्तल मोठ्या प्रमाणात झाली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात २०१० मध्ये केलेल्या वृक्षगणनेत साडेचार लाख झाडे असल्याचे नमुद करण्यात आले होते. परंतु; आता ठाण्यात केवळ २३३० वडाची झाडे आहेत. ठाणे शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडल्यामुळे झाडांचे उच्चाटन सुरू आहे. गेल्या चार वर्षांमध्ये वडाच्या झाडांमध्ये आणखी घट झाली असल्याचे सांगण्यात येते. खरे तर ठाणे शहराच्या आरोग्यासाठी हे झाड बहुगुणी आहे. शहरात धुलिकणांचे प्रमाण वाढले आहे, परंतु हे धुलिकण शोषून घेणारी वडाची झाडे कमी होत आहेत. झाडाच्या पानांमागे बघितले तर मोठ्याप्रमाणात धुलिकण चिकटून बसल्याचे दिसते, असे पर्यावरण तज्ञ डॉ प्रमोद साळसकर सांगतात.

- Advertisement -

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त

शहरात स्थानिक झाडांची संख्या कमी झाल्यामुळे बरेच वेळा सुभाबूळ, आसुपालव, सोनमोहर, गुलमोहर यांसारखी झटपट वाढणारी झाडे लावतात, मात्र या झाडांचा पर्यावरणाच्या दृष्टीने फारसा उपयोग पडत नाही. प्रदुषित हवा शुद्धीकरणासाठी वड, पिंपळ, उंबर, जांभूळ अशा स्थानिक झाडांचा मोठा फायदा आहे. ही झाडे जेवढी जुनी आहेत, तितकीच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. या झाडातून मोठ्या प्रमाणावर शुद्ध प्राणवायू उत्सर्जित केला जातो. झाड जितके जुने तितकेच त्या झाडावर दुर्मिळ पक्षी बघण्याचा आनंद पक्षी प्रेमींना घेता येतो, असे डॉ साळसकर म्हणाले.

आरोग्यवर्धक वड

हा वृक्ष भारतात सर्वत्र आढळतो. हा विस्ताराने खूप मोठा आहे, त्यामुळे याला छायावृक्षही म्हणून संबोधले जाते. या झाडात रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड असून आरोग्याच्यादृष्टीने वडाच्या पानावर वाढलेले अन्न शरीरासाठी उत्तम मानले जाते. या झाडाची फळे, पान, फांदी, डिंक आदी प्रत्येक भागाचा उपयोग आयुर्वेदात दिला आहे. किडलेल्या दातात, वडाचा चिक भरल्याने दाढदुखी कमी होते. मधुमेह रुग्णांसाठी झाडाची फळांचा चांगला उपयोग होतो. नैसर्गिक विधी बंद झाल्यास झाडाची पिकलेली अथवा सुकलेल्या पानांचा काढा करुन द्यावा, तोंडावर काळसर डाग अथवा शिब आल्यास पारब्यांची टोके व ज्येष्ठ मध वाटून लोण्याबरोबर लावावे.

- Advertisement -

झाडाची फांदी जगते

शहरी भागात वडाच्या झाडांचा वानवाच आहे. झाडाचे पुजन करायचे म्हटले तरी झाड शोधावे लागते. आजच्या धावपळीच्या युगात अनेक महिला नोकरी, व्यवसायानिमित्त वडपौर्णिमेला वड पुजनासाठी झाडांच्या फांद्यांचा उपयोग करतात. परंतु पुजन झाल्यावर फांद्या कचराकुंडीत टाकल्या जातात. या फांद्या कचराकुंडीत न टाकता घरामध्येच एका कुंडीत लावून जगवा. हे झाड वाढल्यानंतर पावसाळ्यात एखाद्या मोकळ्या जागेत लावा. वडाच्या झाडाला पाणी कमी लागत असून त्यामुळे काही वर्षात लावलेल्या झाडाचे वटवृक्ष बघायला मिळेल.


प्रशांत सिनकर
(पर्यावरण अभ्यासक)l

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -