घरमुंबईठाण्यातील उघडी गटारेही धोकादायक

ठाण्यातील उघडी गटारेही धोकादायक

Subscribe

गोरेगावच्या पुनरावृत्तीची शक्यता

गोरेगाव येथे उघड्या गटारात दोन वर्षांचा मुलगा पडून वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडल्याने शहरातील उघड्या गटारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे शहरातही पदपथाखालील अनेक गटारे उघड्या अवस्थेत असून अनेकांची झाकणे गायब आहेत. त्यामुळे उघडी गटारे धोकादायक बनली आहेत. त्यामुळे ठाणे महापालिका गोरेगावच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची वाट बघतेय का? असा संतप्त सवाल ठाणेकर विचारत आहेत.

ठाण्यातील वागळे इस्टेट, रामचंद्र नगर, तीन हात नाका, कळवा येथील महात्मा फुले नगर, खारेगाव या भागांतील पदपथांवर असलेली गटारांची झाकणे गायब झाली असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पावसाळ्यात या भागांमध्ये पाणी साचून गटारांचे झाकण दिसेनासे होते, त्यामुळे पथपदावरून जाताना दुर्घटना होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली आहे. विद्यार्थी लहान मुले वृध्द हे उघड्या गटारात पडण्याची शक्यता असते. गोरेगावच्या घटनेनंतर उघडी गटारे जीवघेणी बनली आहेत. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष झाल्याचेच दिसून येत आहे.

- Advertisement -

या गटारांवर चेंबर कव्हर झाकणे लावली जातात. झाकणे निघाली की ती नवीन लावण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च पालिका वर्षाकाठी करते. पालिकेच्या बांधकाम विभागातील इंजिनीयरने वेळोवेळी शहरात फिरून कुठे झाकण निघाले आहे किंवा कसे याबाबत सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. मात्र बांधकाम विभागाचे इंजिनीयर किंवा स्वच्छता निरीक्षक शहरात लक्ष देतात का ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर उघडया गटारांवर झाकण बसवण्याचे काम हाती घ्यावी अशी मागणी ठाणेकरांमध्ये व्यक्त होत आहे.

ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शहरातील उघडी गटारे तातडीने बंदिस्त करण्याचे आदेश दिले होते व त्यानुसार पदपथांवरील गटारांवर झाकणेही बसवण्यात आली. मात्र, त्यांची देखभाल व दुरुस्तीकडे फारस लक्ष दिले गेले नाही. अनेक गटारावरील झाकणे तुटलेली आहेत तर अनेक झाकडे गायब झाली आहेत. तर काही ठिकाणी झाकणांतील सळ्या वर निघाल्याने त्यात पाय अडकून पादचारी जखमी होण्याचे प्रकार ही घडले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -