घरमुंबईबेस्ट बसची धडक लागून 44 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू

बेस्ट बसची धडक लागून 44 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू

Subscribe

कुर्ला येथील घटना; आरोपी बसचालकास अटक

बेस्ट बसची धडक लागून झालेल्या अपघातात राजू शिवराम शेरकर या 44 वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी बसचालक धोंडीभाऊ नाईकरे याला अटक केली आहे. अटकेनंतर त्याला लायक जामिनावर सोडून देण्यात आले आहे. राजू हे बेस्टमध्ये टीसी म्हणून कार्यरत होते, ड्यूटीवर असताना त्यांना एका बसने धडक दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

गोवर्धन राजू शेरकर हा नवी मुंबईतील जुईनगर, सेक्टर 25 मधील भारत सोसायटीमध्ये राहत असून मृत राजू शेरकर हे त्याचे वडिल आहेत. ते बेस्टमध्ये तिकीट तपासनीस म्हणून कार्यरत होते. सोमवारी पहाटे ते कामावर हजर झाले होते. कुर्ला येथील सीएसटी ब्रिजखालील नूर हॉस्पिटलसमोर ते कर्तव्य बजावित होते. यावेळी एका चालकाने हलगर्जीने बस चालवून राजू शेरकर यांना धडक दिली होती. या अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गोवर्धन शेरकर याच्या तक्रारीवरुन कुर्ला पोलिसांनी बसचालक धोंडीभाऊ नाईकरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर त्याला पोलिसांनी अटक केली. मात्र हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याला पोलीस ठाण्यात लायक जामिनावर सोडून देण्यात आले. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश देशमुख हे करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -