घरमुंबईमनसे- अधिकारी वादाचे रूपांतर धडक कारवाईत

मनसे- अधिकारी वादाचे रूपांतर धडक कारवाईत

Subscribe

जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्यासह परवाना विभागाच्या अधिकार्‍याला झालेल्या धक्काबुक्की प्रकरणानंतर मनसे पदाधिकार्‍याला अटक करा या मागणीसाठी कामबंद आंदोलनाचा इशारा देणारे महापालिका अधिकारी कामाला लागले आहेत. मनसेच्या आंदोलनानंतर जी/दक्षिण विभागच नव्हे तर सर्वच विभागाचे कर्मचारी कामाला लागत फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई हाती घेतली आहे. मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांसह विभागांमधील फेरीवाल्यांवर कारवाई करत विभाग साफसुफ करण्यात आला आहे.

फेरीवाल्यांवर न होणार्‍या कारवाईचा जाब विचारत मनसेने विभागप्रमुख संतोष धुरी यांच्यासह चार पदाधिकार्‍यांनी जी-दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त जैन यांना धक्काबुक्की तसेच शिवीगाळ केली. याचा निषेध म्हणून मागील सोमवारी कामगार संघटनांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर दोन दिवसांची मुदत देवून धक्काबुक्की न करणार्‍यांना अटक न झाल्यास पुन्हा कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला होता. परंतु याच दरम्यान मनसेनेही आक्रमक होत समाजमाध्यमावर सहायक आयुक्त चोर आहे,असा प्रचार सुरू केला.

- Advertisement -

त्याचा धसका घेत दादर रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात येत आहे. दादर रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे पुन्हा मुंबईकरांना मोकळेपणाने चालता येत आहे. केवळ दादरच नव्हेतर कांदिवली,जोगेश्वरी,अंधेरी, भांडुप, मुलुंड, वांद्रे आदी भागांमध्ये फेरीवाल्यांवरील कारवाई जोरात सुरू आहे. मनसेच्या पदाधिकार्‍यांना अटक करा, नाहीतर कामबंद आंदोलन केले जाईल असा इशारा देणारे महापालिकेचे कर्मचारी उलट जोमाने काम करत असल्याची प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे. मनसेने समाजमाध्यमावर जी मोहीम राबवली त्याचा हा परिणाम असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.

धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर
जैन यांच्यासह महापालिकेच्या परवाना विभागाच्या अधिकार्‍याला झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी पोलीस ठाण्यात मनसेचे विभागप्रमुख संतोष धुरी यांच्यासह चार जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनसेने न्यायालयात धावून धुरी यांच्यासह चार जणांची अटक टाळण्यासाठी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तो अर्ज न्यायालयाने मान्य केला असल्याचेही देशपांडे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -