घरमुंबईएमएमआरडीएचे क्षेत्र वसई, पेण, अलिबागपर्यंत विस्तारले

एमएमआरडीएचे क्षेत्र वसई, पेण, अलिबागपर्यंत विस्तारले

Subscribe

दोन हजार चौ.किमी इतके क्षेत्र वाढले

मुंबई, ठाणे, नवी मुंबईपर्यंत सीमित मुंबई उपनगर प्रादेशिक विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएचे क्षेत्र हे अलिबाग, पनवेल, पेण, खालापूर आणि वसई या भागांपर्यंत विस्तारले आहे. या क्षेत्रांना एमएमआरडीएशी जोडण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे या भागातील विकासकामांना गती मिळणार असून एमएमआरडीएच्या एकूण क्षेत्रात २ हजार चौ.कि.मी.ने वाढ होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील विकासकामे रखडलेली आहेत. या भागांमधील ग्रामपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका अशा क्षेत्रांमधून जाणारे रस्ते नेमके कोणी करायचे यावर निर्णय होत नव्हते. त्याच प्रमाणे या भागातील विकासकामे कोणी करायची यावरून देखील कामे रखडत असल्याचे लक्षात येत होते. ही समस्या लक्षात घेऊन मुंबई व ठाणे या शहरांशी संलग्न शहरांना एमएमआरडीए क्षेत्रात आणले गेले तर या भागांचा विकास योग्य पद्धतीने आणि जलदगतीने होईल, असा विचार राज्य सरकारने केला.

- Advertisement -

विरार-अलिबाग बहुउद्देशीय कॉरिडोर निर्मितीसाठी जागतिक बँकेकडून कर्ज मिळवण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले होते. एकूण १४ हजार कोटी रुपये खर्चाचा आणि १६ मार्गिका असलेला हा कॉरिडोर बांधण्याची जबाबजदारी राज्य सरकारने एमएमआरडीएकडेच सोपवलेली आहे. आजच्या या निर्णयामुळे या कॉरिडोरची निर्मिती होत असताना या प्रकल्पाशी संबंधित कामे, तसेच आसपासच्या परिसराचा जलद आणि योग्य दिशने विकास करणे सोपे झाले आहे.

१९६७ ला अधिसूचित झालेल्या मुंबई महानगर प्रदेशचे भौगोलिक क्षेत्र ३९६५ चौरस किलोमीटर होते. त्यानंतर त्याची हद्द वाढवून ते ४३५५ चौरस किलोमीटर करण्यात आले. यात प्रामुख्याने पेण व अलिबाग तालुक्याचा काही भाग समाविष्ट करण्यात आला होता. प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांमुळे ही हद्द वाढविण्याची मागणी होती. या प्रकल्पांमध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-सूरत शीघ्रगती महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, पालघर जिल्हा व उद्योग केंद्र, मुंबई पारबंदर प्रकल्प, विरार-अलिबाग मल्टिमोडल कॉरिडॉर, विविध मेट्रो प्रकल्प आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या निर्णयामुळे एमएमआरडीएच्या एकूण क्षेत्रात दोन हजार चौ.किमी इतकी वाढ होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -