घरमुंबईठेकेदार वसुल करतो कचरा उचलण्याचे पैसे

ठेकेदार वसुल करतो कचरा उचलण्याचे पैसे

Subscribe

भास्करनगरमधील रहिवाशांना ठामपाचा भुर्दंड

मागील 20 ते 25 वर्षांपासून वाघोबानगर आणि भास्कर नगरमध्ये असणार्‍या पारसिक बोगद्यावर आणि दोन्ही बाजूला कचर्‍याचे साम्राज्य बनले होते. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या घनकचरा विभागाच्यावतीने हा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. तरीही ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे अद्यापही संपूर्ण परिसर स्वच्छ झाला नाही. मात्र हा कचरा उचलण्याचा भुर्दंड येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. ठामपाच्यावतीने नेमण्यात आलेल्या ठेकेदाराकडून प्रत्येक घरातून कचरा नेण्यासाठी नागरिकांकडून प्रत्येकी 30 रुपये महिन्याकाठी घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

भास्करनगर परिसरात सुमारे तीन हजारहून अधिक झोपड्या आहेत. या प्रत्येक झोपडीमागे येथील ठेकेदार कचरा उचलण्याचा भुर्दंड घेत आहे. शिवाय याची रितसर पावती देखील देत आहे. ज्यावर मैत्री महिला बहुद्देशीय सामाजिक विकास संस्था, कळवा प्रभाग समिती असे स्पष्टपणे लिहिले आहे. याबद्दल संस्थेशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया देण्याचे संस्थेने टाळले. प्रत्येक परिसरातील कचरा उचलण्याचे कंत्राट ठराविक ठेकेदाराला पालिकेकडून देण्यात येते.

- Advertisement -

ठामपाच्यावतीने कंत्राटदाराला ठराविक रक्कम ठरवून दिली जाते. त्यानुसारच ठेकेदार ही कामे करत असतो. तरीही या परिसरातील ठेकेदार नागरिकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल करत आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या परिसराच्या विकासासाठी 10 कोटी रुपयांची विशेष तरतूद केली आहे. असे असताना नागरिकांकडून ठेकेदार कोणत्या कारणाने कचरा उचलण्याचे पैसे आकारत आहे, असा सवाल येथील नागरिक करीत आहे.

ठाणे महानगर पालिकेने घंटागाडी प्रकल्प अर्थात ठिकठिकाणी जाऊन कचरा उचलण्याचे कंत्राट ठेकेदाराला दिले आहे. मात्र त्यासाठी प्रत्येक ठिकाणी सोसायटी अथवा नागरिक येऊन त्या घंटागाडीमध्ये कचरा टाकतात. पारसिक परिसरातील भास्कर नगर हा भाग डोंगराळ असून घंटागाडी तिथपर्यंत जात नाही. परिणामी तेथे प्रचंड कचरा जमा होतो. त्यामुळे पालिकेने कंत्राटदाराला येथील नागरिकांकडून काही रक्कम घेऊन घरोघरी जाऊन त्यांचा कचरा उचलावा अशी विनंती केली आहे. म्हणूनच कंत्राटदार महिन्याला काही रक्कम घेत आहे. तसा पालिकेचा ठरावच आहे.
– प्रकाश इंद्रदास बर्डे, नगरसेवक, सदस्य कळवा प्रभाग समिती, ठाणे महानगर पालिका.

- Advertisement -

ठामपा क्षेत्रातील पाच हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेली तसेच दररोज शंभर किलो कचरा निर्माण करणारी गृहसंकुले, हॉटेल, मॉल, रुग्णालये आणि अन्य आस्थापनांना कचर्‍याची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. असे असताना अद्यापही कोणीच याचे पालन करत नाही. परिणामी घंटागाडीमार्फत प्रत्येक ठिकाणी हा प्रचंड कचरा उचलल्या जातो. तिथे कोणताही दंड आकारण्यात आलेला नाही. मात्र झोपडपट्टी परिसरातील लोकांना त्यांचा कचरा उचलण्यासाठी भुर्दंड देण्यात येतो. हा दुजाभाव का? आम्हीच कचर्‍यासाठी पैसे का मोजायचे.
– अयुब आसार शेख, स्थानिक नागरिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -