Eco friendly bappa Competition
घर मुंबई मुंबईत कागदी कंदिलांची मागणी जास्त

मुंबईत कागदी कंदिलांची मागणी जास्त

Subscribe

दिवाळी जवळ येत चालली आहे तसं मुंबई शहर अधिक उजळायला लागलं आहे आणि याचं सर्वात महत्त्वाचं आणि लक्षवेधक कारण म्हणजे मुंबईच्या बाजारामध्ये मिळणारे विविधरंगी कंदील. दिवाळी आता एका आठवड्यावर येऊन ठेपली आहे आणि घरोघरी कोणत्या आणि कशा प्रकारचे कंदील आपल्या घरामध्ये लावायचे आहेत याची चर्चा सुरु झाली आहे. यामध्ये लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचाच सहभाग दिसून येत आहे.

दरवर्षीप्रमाणेच माहिममधील कंदील गल्ली कंदिलाच्या रोषणाईने फुलून गेली आहे. आता एकच आठवडा शिल्लक असल्यामुळे आता कंदिलाच्या विक्रीला जोरात सुरुवात झाली आहे. माहिमची ही कंदिल गल्ली एक आठवडा आधी संपूर्ण सजून जाते. त्याप्रमाणेच कंदिलाच्या या मोठ्या बाजारात खरेदीला सुरुवात झाली आहे.स्टार्स, गोल आकाराचे, साधे, कागदी, प्लास्टिकचे असे सर्व प्रकारचे कंदिल यावर्षीदेखील बाजारामध्ये दिसून येत आहेत.

- Advertisement -

मुंबईतल्या सर्वच बाजारपेठा आता कंदिलाने सजल्या आहेत. कंदिलाच्या रोषणाईने सर्व जागा उजळून निघाल्या आहेत. प्लास्टिक बंदीनंतर आता यावर्षी बर्‍याच ठिकाणी कागदाचे कंदील जास्त प्रमाणात दिसत आहेत. अर्थात प्लास्टिकचे कंदील नाहीत असेही नाही. मात्र यावर्षी बाजारामध्ये कागदी कंदिलांना जास्त मागणी असल्याचे दादर पश्चिममधील निळू पवार या विक्रेत्याने सांगितले. त्यामुळे यावर्षी प्लास्टिकच्या कंदिलांपेक्षा विक्रीसाठीदेखील कागदी कंदील जास्त प्रमाणात ठेवण्यात आल्याची माहितीही सदर विक्रेत्याकडून मिळाली आहे.

याशिवाय लहान मुलांसाठीही अगदी लहान कंदिलांची रांगच्या रांग तुम्हाला बाजारामध्ये दिसून येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दिवाळी झाल्यानंतरही घरामध्ये शोभेसाठी असे लहान कंदिल कायमस्वरूपी ठेवता येतात. त्यामुळे अशा लहान कागदी कंदिलांना जास्त मागणी आहे. याशिवाय या एका कंदिलाची किंमत ही साधारण १५ रूपयापासून सुरु होत असल्यामुळे असे कंदिल सध्याच्या महागाईच्या काळात परवडण्याजोगेही आहे.

- Advertisement -

दरम्यान साधे कागदी मोठे कंदिल हे १५० रुपयांपासून सुरु होत आहेत. तर वेगवेगळ्या आकारातील कंदिलाची किंमत ही त्यांच्या आकाराप्रमाणे कमी जास्त आहे. प्लास्टिक कंदिलांची किंमत ही साधारण २५० ते ३०० दरम्यान असून कागदी कंदिलांची किंमत त्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे लोकांचा कल पर्यावरणासाठी पूरक असणार्‍या कागदी कंदिलाकडे जास्त असल्याचे गृहिणी रेखा आंबेकर यांनी आपलं महानगरला सांगितले. दरम्यान आता राजकीय पक्षांनीही यावर्षीपासून कागदी कंदिलांनाच महत्त्व दिल्याची बातमी आपलं महानगरमधून देण्यात आली होती. त्याचप्रमाणे बाजारामध्ये या कागदी कंदिलाला जास्त मागणी असल्याचे दिसून आले आहे.

- Advertisment -