घरमुंबईवसईचा किल्ला उजळला २१ हजार दिव्यांनी

वसईचा किल्ला उजळला २१ हजार दिव्यांनी

Subscribe

मराठ्यांच्या शौर्याला प्रकाशाच्या मुजरा

वार्ताहर:-रयतेच्या घरी दिवाळी साजरी व्हावी यासाठी हौतात्म्य पत्करणार्‍या 21 हजार मराठ्यांचे स्मरण करण्यासाठी दिवाळीच्या पूर्वसंध्येला 21 हजार दिव्यांनी वसईचा किल्ला उजळवण्यात आला.धर्मांध पोर्तुगीजांच्या जाचातून वसईकरांना मुक्त करण्यासाठी 21 हजार मराठ्यांनी आपले बलीदान दिले.सर्वांच्या घरी दिवाळी साजरी व्हावी यासाठी त्यांनी स्वतःच्या घराचा, दिवाळी, दसर्‍याचा त्याग केला. अशा या पराक्रमी,बलिदानी मराठा सैन्याच्या शौर्याचा साक्षीदार असलेला वसईचा किल्ला मात्र, ऐन दिवाळीत अंधारात गडप होत असतो. त्याचवेळी या शहरातील सर्व मॉल, दुकाने, घरे, बंगले, मंदिरे रस्तेही झगमगत असतात. ही बाब निदर्शनास आल्यानंतर स्थानिक परिवार आणि धर्मसभेच्या सौजन्याने ‘आमची वसई टीम’ने दरवर्षी वसईच्या किल्ल्यात दीपोत्सव साजरा करायचे ठरवले. त्यानुसार वसुबारसेला 21 हजार पणत्यांनी वसईचा किल्ला उजळवून टाकण्यात आला.

सुरवातीला नरवीर चिमाजी आप्पा यांच्या स्मारकाजवळ विविधरंगी रांगोळ्या काढण्यात आल्या. त्यानंतर किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, नागेश महातीर्थ आणि सागरी दाराजवळ तोरणे, पताके लावण्यात आले. किल्ल्यात भव्य आकाश कंदील लावण्यात आला. त्यानंतर मशालींच्या दिमाखदार उजेडात, वाद्यांच्या गजरात जय वज्राई, जय चिमाजीच्या घोषणांनी वसईचा किल्ला दणाणून गेला. दरम्यान, धर्मसभा अध्यक्ष वेदमूर्ती धनंजय शास्त्री वैद्य यांनी मत्रोच्चारात दीपप्रज्वलन केले. 205 वर्षांच्या जुलमी फिरंगी सत्तेला खणून काढण्यासाठी तीन वर्षांच्या दुर्धर संग्रामात 21 हजार मराठा सैन्य हुतात्मा झाले. या वीरभूमीवर त्यांच्या देशभक्तीचे स्मरण करण्यासाठी या दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी वैद्य यांनी सांगितले. ‘आमची वसई टीम’ने केलेल्या आवाहनानुसार डहाणू ते ठाणे-मुंबईतील विविध संस्था, पक्ष, सर्वधर्मीय राष्ट्रभक्त या उत्सवात सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -