घरमुंबईसरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये...; कारवाईबाबत संजय राऊतांचे फडणवीसांना पत्र

सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये…; कारवाईबाबत संजय राऊतांचे फडणवीसांना पत्र

Subscribe

मुंबई : राज्यातील सत्ताधारी आणि विरोध एकमेकांवर आगपाखड करत असतानाच एकमेकांचे भ्रष्टाचारही बाहेर काढत आहेत. भाजपाकडून किरीट सोमय्या, तर विरोधी पक्षाकडून संजय राऊत भ्रष्टाचार बाहेर काढत कारवाई करण्याची मागणी करत आहेत. अशातच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना ट्विटरच्या माध्यमातून पत्र पाठवून भाजपा नेते किरीट सोमय्या, आमदार राहुल कुल आणि शिंदे गटातील दादा भुसे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या आधीही राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना एक-दोन वेळा याचसंदर्भात पत्र लिहिली आहेत.

संजय राऊतांनी पत्रात लिहिले की, देवेंद्रजी तुम्ही 1 एप्रिल 2023 ला एक विधान केले होते ते मी ऐकले आणि मला गृहमंत्री म्हणून अभिमान वाटला. तुम्ही म्हणाला होतात, मी गृहमंत्री झाल्यापासून अनेकांची अडचण झाली आहे. बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना मी सोडणारी नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करणार म्हणजे करणार. तुम्ही घेतलेल्या या भूमिकेबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच, पण आपण जे बोलत आहात तसे महाराष्ट्रात खरोखरच घडते आहे काय?, असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले की, आपल्या सरकारमधील अनेकांची बेकायदेशीर कृत्ये व लांड्यालबाड्या याबाबत कारवाई करण्याबाबत मी आपल्याकडे पुराव्यांसह येऊन भेटू इच्छितो. पण गेल्या चार महिन्यांपासून आपण मला भेट देण्यास टाळाटाळ करीत आहात.

- Advertisement -

मी खालील भ्रष्टाचार व बेकायदेशीर प्रकरणांबाबत आपली भेट घेऊ इच्छितो. त्यामुळे आपल्या सोयीची वेळ कळवावी, असे मागणी करताना संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या, आमदार राहुल कुल आणि शिंदे गटातील दादा भुसे यांच्या भ्रष्टाचाराबाबत तपशीलवार माहिती दिली आहे.

१) भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखालील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात (ता. दौड) प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे. शेतकऱ्यांच्या पैशांची अक्षरश: लुटमार झाली असून किमान ५०० कोटींचे मनीलाँडरिंग झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. संबंधित कारखान्यांचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी यांच्यासह मी आपली या बेकायदेशीर प्रकरणावर कारवाई व्हावी म्हणून भेट घेऊ इचितो.

- Advertisement -

२) आपल्या मंत्रिमंडळातील दादा भुसे (मालेगाव) यांनी ‘गिरणा ऍग्रो’ नावाने १७८ कोटींचे २५ लाख शेअर्स शेतकऱ्यांकडून गोळा केले. गिरणा कारखाना वाचविण्यासाठी भुसे यांनी हे पैसे गोळा केले. या रकमेचा अपहार झाला असून कंपनीच्या वेबसाईटवर केवळ १ कोटी ६७ लाखांचे शेअर्स फक्त ४७ शेतकऱ्यांच्या नावावर दाखवले. या अशा भ्रष्टाचारी कृत्याबाबत कोणालाही पाठीशी न घालण्याचे आपले धोरण असायला हवे आणि त्या भ्रष्टाचाराबाबत मी आपणास अधिक माहिती देऊ इच्छितो.
३) किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी जनतेकडून पैसे जमा केले. त्याचाही हिशेब दिलेला नाही. उलट राज्यात तुम्ही गृहमंत्री होताच मुंबई पोलिसांनी या गुन्ह्याची चौकशी थांबवून सोमय्या यांना ‘क्लीन चिट’ दिली हे धक्कादायक आहे. अशा सर्व बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करून जनतेच्या पैशांवर सुरू असलेली दरोडेखोरी थांबवावी अशी माझी विनंती आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -