घरमुंबईभारतामध्ये वाढतोय ऍनिमियाचा विळखा

भारतामध्ये वाढतोय ऍनिमियाचा विळखा

Subscribe

आधुनिक जीवनपद्धती, जागतिकीकरणामुळे आलेली स्पर्धा, निःसत्व आहार सेवन, तसंच आर्थिक गणिते बिघडल्यामुळे होणाऱ्या मानसिक ताण तणावामुळे आपलं शरीर थकत असून ‘ऍनिमिया’सारखा आजार शरीराला विळखा घालून बसला आहे.

आपल्या शरीरात असलेले रक्त म्हणजे जीवन असते, म्हणूनच अपघातात रक्तस्राव झाला तर आपलं जीवन धोक्यात येते किंवा संपते. अशा या जीवनरूपी रक्ताची जेव्हा हानी म्हणजेच त्यामध्ये काही कमतरता आढळते तेव्हा शरीर मृत व्यक्तीप्रमाणे निस्तेज बनते आणि त्वचा फिकी दिसू लागते, याला आयुर्वेदामध्ये पण्डूरोग असेही म्हणतात. पूर्वी सकस आहार पद्धतीमुळे आणि शारीरिक मेहेनतीच्या कामामुळे ऍनिमियाचे प्रमाण फारच कमी होते.

यामुळे होतोय ऍनिमिया

दोन दशकापूर्वी हा रोग आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या नागरिकांना म्हणजेच ज्यांच्या आहारामध्ये पौष्टिकतेची कमतरता आहे, अशांनाच होत होता. पण, आता ऍनिमियाने प्रत्येक जणच ग्रस्त असल्याची शंका डॉक्टर व्यक्त करतात. आधुनिक जीवनपद्धती, जागतिकीकरणामुळे आलेली स्पर्धा, निःसत्व आहार सेवन, तसंच आर्थिक गणिते बिघडल्यामुळे होणाऱ्या मानसिक ताण तणावामुळे आपलं शरीर थकत असून ‘ऍनिमिया’सारखा आजार शरीराला विळखा घालून बसला आहे.

- Advertisement -

याविषयी अधिक माहिती देताना नेरुळ -नवी मुंबई येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टरच्या स्त्री रोग विशेषज्ञ डॉ. सहाना हेगडे यांनी सांगितलं, ” ऍनिमिया म्हणजे सोप्या भाषेत रक्तातील लाल पेशी आणि हिमोग्लोबीनच्या प्रमाणामध्ये कमतरता. हिमोग्लोबीन हा लाल रक्तपेशीमधील प्रमुख घटक असून तो सर्व शरीरातील पेशी आणि अवयवांना प्राणवायूचा पुरवठा करतो. रक्तातील लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबीन कमी झाल्यास शरीरात प्राणवायूचा योग्य पुरवठा होत नाही आणि ऍनिमिया होतो. ‘हिमोग्लोबीन’ हे एक प्रथिने आहे. हिम म्हणजे आयर्न आणि ग्लोबीन म्हणजे अमिनो ऍसिड प्रोटीन. आपल्या आहारामध्ये प्रथिनांची कमतरता असल्याने अनेकदा आपण शारीरिक खेळांमध्ये कमी पडतो. जर गर्भावस्थेत आईने व्यवस्थित संतुलित आहार आणि आयर्न, फॉलिक अॅसिडच्या गोळ्या घेतल्या नाहीत तर बाळालाही रक्ताल्पता (ऍनिमिया)चा त्रास होऊन ते बाळ शारीरिक दृष्टया दुर्बळ होऊ शकतं. आहारामध्ये हिरव्या भाज्या, शेंगा प्रकारातील भाज्या, मसूर, तूर, गूळ, खजूर, डाळींब, गहू, जुने तांदूळ, तूप यांत बरेच लोह असते. या आहारीय द्रव्याबरोबर मोड आणलेल्या कडधान्यांचा वापर केल्यास लोह रक्तात मिसळण्यासाठी सहाय्यभूत ठरते.”

का होतो ऍनिमिया ?

बदललेल्या जीवनशैलीमुळे ऍनिमिया होतो अशी सर्वसाधारण भावना असली तरी हिरव्या भाज्या न खाणं, बीट-गाजर अशा कंदमुळांचा अभाव, जास्त तेलकट-मसालेदार-चटपटीत खाणं, फास्टफूडचं अतिसेवन, अन्न पचलेले नसतानाही खाणे, खाल्ल्यानंतर – जेवणानंतर लगेच झोपणे, व्यायामाचा आणि शारीरिक मेहनतीचा अभाव म्हणजेच निकृष्ट आहार पद्धती हे ऍनिमियाचे प्रमुख कारण ठरत आहे.

महिलांमध्ये ऍनिमियाचे प्रमाण जास्त

मासिक पाळीच्या वेळी जास्त प्रमाणात रक्त जाणे. तसेच प्रसुतीपश्‍चात अधिक रक्तस्राव होणे आणि‘डाएट’च्या नावाखाली पोषक आहाराच्या अभावामुळे महिलांमध्ये ऍनिमियाचे प्रमाण वाढत आहे, अशीही माहिती डॉ. हेगडे यांनी दिली. बर्‍याच दिवसांपासून लोहाची कमतरता असल्यास जिभेवर किंवा तोंडात घाव येतात गिळताना त्रास होतो. लोहाच्या कमतरतेच्या लक्षणांना फार मोठ्या तक्रारींनी सुरुवात होत नाही. अगदी थकव्यासारख्या सामान्य लक्षणांपासून सुरुवात होते. उत्तम संतुलित आहार, योगसाधनेच्या आधारे आणि डॉक्टरांच्या योग्य सल्ल्याने ‘ऍनिमिया’वर मात करता येऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -