घरमुंबईलॉकडाऊनची चर्चा नाही, कोरोना रोखण्यासाठी कठोर उपाय; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत

लॉकडाऊनची चर्चा नाही, कोरोना रोखण्यासाठी कठोर उपाय; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत

Subscribe

कोरोनाची चिंता वाढत असताना बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली

राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली. यावेळी लॉकडाऊनबाबत कोणतीही चर्चा झाली नसली तरी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वच आघाड्यांवर कठोर उपाययोजना करण्याबाबत बैठकीत एकमत झाल्याचे समजते.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. बुधवारी आठ हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. यामुळे चिंता वाढत चालली असताना बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. बैठकीत कोविड परिस्थितीवर सर्वंकष चर्चा करण्यात आली. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. मास्क लावणे, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसुत्रीविषयी नागरिकांत जनजागृती करणे, मी जबाबदार मोहिमेची अंमलबजावणी करणे तसेच सर्वांना लसीकरण याबाबत बैठकीत सादरीकरण करण्यात आले. मी जबाबदार मोहीम व लसीकरणास प्राधान्य देण्याचेही निश्चित करण्यात आले.

- Advertisement -

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्यावर पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकट घोंगावू लागले आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत प्रत्यक्षात लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला होता. नागरिकांनी नियम पाळले नाहीत तर पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी बजावले होते. कोरोना संदर्भातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा. गरज भासल्यास कठोर निर्णय घ्या, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला आधीच दिलेली आहे. हे पाहता आजची मंत्रिमंडळ बैठक महत्वाची ठरली आहे. बदलत्या परिस्थितीत सरकारी पातळीवर वेगवान घडामोडी होताना दिसत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -