घरमुंबईपी.एम.लोखंडे मार्ग, सिध्दार्थ कॉलनी आणि घाटल्याला करोनाचा विळखा

पी.एम.लोखंडे मार्ग, सिध्दार्थ कॉलनी आणि घाटल्याला करोनाचा विळखा

Subscribe

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाढतेय चेंबूरमध्ये बाधित रुग्णांची संख्या

मुंबईतील पहिला करोनाचा बळी चेंबूरमध्ये गेला. चेंबूरमधील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असतानाच पुन्हा बाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. पी.एम. लोखंडे मार्ग, सिध्दार्थ नगर आणि घाटला ही क्षेत्र करोनाबाधित रुग्णांचे हॉटस्पॉट बनले आहेत. आतापर्यंत सुमारे ९०० हून अधिक रुग्णांची संख्या असलेल्या या विभागात आतापर्यंत मृतांचा आकडा ७०च्या आसपास गेला आहे. मात्र, महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी, नगरसेवकांनी केलेल्या सुचनांची वेळीच दखल न घेतल्याने रुग्णांची संख्या आता वाढू लागली आहे. बाधित क्षेत्रांमध्ये नियमांची काटेकोर अंमलबजावणी न झाल्याने तसेच सार्वजनिक शौचालयांची साफसफाई व सॅनिटायझेशनचे काम योग्यप्रकारे केले जात नसल्यानेच रुग्णांची संख्या वाढत असल्याचे लोकप्रतिनिधींसह नागरिकांचे म्हणणे आहे.

चेंबूरमधील पहिला बळी निळकंठ इमारतीत गेला. करोनाची सुरुवात ही पी.एम. लोखंडे मार्गपासून झाली. आजही तो भाग बाधित क्षेत्र आहे. येथे एकूण ८० टक्के झोपडपट्टी परिसर आहे. पी. एम. लोखंडे मार्गावर आतापर्यंत २००च्या जवळपास बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सिध्दार्थ नगरमध्ये ३० ते ३५ आणि घाटला, आनंदनगर व परिसरात ६० ते ७० बाधित रुग्ण आहेत. बाकी सर्व रुग्ण टिळकनगर, पेस्तम सागर, माहुल, ठक्करबाप्पासह इतर भागांमध्ये आहेत. आतापर्यंत या चेंबूरमध्ये सुमारे ९०० रुग्ण आढळून आले असून त्यातील सुमारे २५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५५०एवढी असून बाकी सर्व रुग्ण शोधून काढण्यात आले आहेत. शनिवारपर्यंत या विभागातील मृतांची संख्या ६७ पर्यंत होती.

- Advertisement -

पी.एम.लोखंडे मार्गावर माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी सर्व स्थानिक पक्षांच्या पदाधिकार्‍यांना आणून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आठ दिवसांचा लॉकडाऊन केला. त्याचा काहीसा परिणाम दिसून आला. पी.एम.लोखंडे मार्गावर बहुतांशी महापालिका व अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणारे कामगार, कर्मचारी असल्याने, तसेच घाटलामध्येही अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी असल्याने याठिकाणी बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. पूर्वी येथील अनेक सार्वजनिक शौचालयांची सफाईही किटकनाशक विभागाच्यावतीने केली जायची. परंतु आता घनकचरा व्यवस्थापनाच्या अधिपत्याखाली ही स्वच्छता आणि सॅनिटायझेशन केले जात असले तरी यातील काही कामगारच बाधित झाल्याने अनेक सामूहिक शौचालयांची सफाई योग्यप्रकारे होत नाही. एम-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त पृथ्वीराज चव्हाण यांना चेंबूरची भौगोलिक परिस्थिती पूर्ण ज्ञात असतानाही केवळ लोकप्रतिनिधींशी त्यांनी असहकार पुकारल्यामुळे त्यांना या विभागातील बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात अपयश आल्याचे बोलले जात आहे.

* चेंबूर-टिळकनगरमधील करोनाबाधितांची आकडेवारी
* एकूण बाधित रुग्णांची संख्या: सुमारे ९००
* बरे होऊन परतलेले रुग्ण: सुमारे २५०
* अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या: ५५०
* एकूण मृतांची संख्या : ६७

- Advertisement -

सिध्दार्थ कॉलनीत सर्वाधिक ३० ते ३५ बाधित रुग्ण आढळून आले, परंतु जेव्हा चेंबूरमध्ये रुग्ण आढळून येत होते, तेव्हा सिध्दार्थ नगरमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लॉकडाऊन करण्याची सूचना विभागीय सहायक आयुक्तांना केली होती. तेव्हा तिथे एकही रुग्ण नव्हता. परंतु त्यांनी दुर्लक्ष केले आणि पुढे मग तिथे जास्त रुग्ण वाढू लागले. –आशा मराठे, स्थानिक नगरसेविका आणि अध्यक्षा, एम-पश्चिम प्रभाग समिती

टिळक नगर कॉलनी, पेस्तमसागर, छेडा नगर, पंचशिल नगर आदी ठिकाणी रुग्ण आढळून आले आहेत. प्रशासनातील अधिकारी व वैद्यकीय अधिकार्‍यांची टीम योग्यप्रकारे काम करत असले तरी पुढे त्यांना सहकार्य मिळत नाही. त्यामुळे क्वारंटाईन तसेच रुग्णांना दाखल करून घेण्यात अडचणी येतात.
-सुषमा सावंत, स्थानिक नगरसेवक, भाजप.

चेंबूर घाटल्यातील आनंदनगरसह खारदेव नगर परिसर आदी सर्वच ठिकाणी करोनाबाधित रुग्ण आहेत. आता गावठाणांमध्येही आढळून येत आहेत. विभागात शौचालयांची दरदिवशी साफसफाई आणि सॅनिटायझेशन होते. प्रत्येक दिवशीचे फोटो मला पाठवले जातात. दिवसांतून दोनदा सॅनिटायझेन केले जाते.
-अनिल पाटणकर, स्थानिक नगरसेवक, शिवसेना, अध्यक्ष, बेस्ट समिती.

पी.एम.लोखंडे मार्गावरच सर्वाधिक जास्त रुग्ण आढळून आले असून या विभागात सहायक आयुक्तांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. प्रशासनाकडून आपल्या विभागात कोणतेही सहकार्य मिळत नाही. महापालिकेची कोणतीही सुविधा याठिकाणी पुरवली जात नाही. शौचालयांची स्वच्छता योग्यप्रकारे होत नाही.
-संगीता चंद्रकांत हंडोरे, स्थानिक नगरसेविका,काँग्रेस.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -