घरमुंबईविक्रोळी पार्कसाईट येथील नियोजित रुग्णालयाला १४ वर्षांनंतर मुहूर्त!

विक्रोळी पार्कसाईट येथील नियोजित रुग्णालयाला १४ वर्षांनंतर मुहूर्त!

Subscribe

आगामी अडीच वर्षात हे अद्यावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे.

विक्रोळी पार्क साईट येथील दवाखान्याच्या जागेत ३० खाटांचे अद्यावत रुग्णालय उभारण्याचे काम गेल्या १४ वर्षांपासून विविध कारणास्तव रखडले होते. अखेर माजी नगरसेवक हारून खान (पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आता शिवसेना) आणि त्यांची पत्नी नगरसेविका ज्योती हारून खान (राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. १४ वर्षांनंतर तळघर + तळमजला + सात मजली रुग्णालय उभारण्यास मुहूर्त मिळाला आहे. ३९.३८ कोटी रुपये खर्चून हे अद्यावत रुग्णालय उभारण्याबाबचा प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर या रुग्णालयाच्या बांधकामांचे कार्यादेश प्राप्त झाल्यावर कंत्राटदाराकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

आगामी अडीच वर्षात हे अद्यावत रुग्णालय उभारण्यात येणार आहे. हे रुग्णालय उभारल्यानंतर विक्रोळी पार्क साईट, विक्रोळी, घाटकोपर, पवई या परिसरांमधील हजारो नागरिकांना या रुग्णालयात डायलिसिस, एमआरआय, प्राथमिक वैद्यकीय सुविधा, उपचार तातडीने मिळण्यास मोठी मदत होणार आहे. या रुग्णालयामुळे सायन, राजावाडी येथील रुग्णालयावर पडणारा वैद्यकीय सुविधांचा ताण कमी होण्यासही फार मोठी मदत होणार आहे.

- Advertisement -

विक्रोळी पार्कसाईट रोड – नंबर १ सिटीएस क्रमांक २२ (भाग) येथे गेल्या ३० वर्षांपूर्वीपासून पालिकेचा छोटा दवाखाना होता. त्या ठिकाणी काही नर्स राहत होत्या. या दवाखान्यात विक्रोळी पार्क साईट येथील किमान ५०० नागरिक, डोंगरावर राहणारे गरीब लोक वैद्यकीय उपचारासाठी दररोज येत असतात. त्यामुळे नागरिकांना अद्यावत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी राजावाडी रुग्णालय किंवा पुढे सायन रुग्णालयात रात्री-अपरात्री धाव घ्यावी लागत असते.

ही गंभीर बाब लक्षात घेऊन हारून खान यांनी ते नगरसेवक पदावर असताना म्हणजे २००६ पासून त्यांनी या दवाखान्याच्या जागेत अद्यावत छोटे रुग्णालय उभारण्याची मागणी वारंवार पालिका सभेत, प्रभाग समिती बैठकीत केली होती. मात्र, रुग्णालयासाठी जागा छोटी आहे आणि तिथे नर्स क्वार्टसचे आरक्षण आहे, रस्ता रुंदीकरण होणार आहे आदी कारणे देण्यात आल्याने रुग्णालय उभारण्याच्या कामात काही काळ अडथळा आला, असे हारून खान यांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच, स्थानिक आमदारांनी सदर जागा खासगी रुग्णालयासाठी देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र आपण त्याला विरोध केला होता. खासगी रुग्णालय झाल्यास सामान्य नागरिकांना ते परवडणार नाही. त्यामुळे पालिकेचेच रुग्णालय उभारल्यास ते सर्वसामान्य नागरिकांसाठी सोयीचे व सुलभ होईल, अशी आग्रही भूमिका हारून खान यांनी मांडली. मात्र, अतिरिक्त आयुक्तपदी आय. ए. कुंदन या असताना त्यांनी रुग्णालय उभारण्याबाबतच्या कामाला मदत केली, असे त्यांनी सांगितले. मे. मरूधर एंटरप्रायजेस या कंत्राटदारामार्फत हे रुग्णालय उभारण्याचे काम होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -