घरमुंबईकालिदास कोळंबकर यांचा गावित होणार

कालिदास कोळंबकर यांचा गावित होणार

Subscribe

लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीने मुंबईतील सहाही जागांवर पुन्हा वर्चस्व मिळवल्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक युतीत लढण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे, परंतु युती झाल्यास वडाळा विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असून, २०१४च्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर असल्यामुळे त्यांचाही तिथे दावा आहे, पण वडाळ्याचे आमदार कालिदास कोळंबकर हे भाजपच्या संपर्कात असून, जर शिवसेनेला हा मतदारसंघ सोडल्यास भाजपकडून कोळंबकर यांना उमेदवारी देण्याची अट घातली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तसे कोळंंबकर यांचा राजेंद्र गावित होईल,असे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणूकही युतीत लढण्याचे शिवसेना आणि भाजपने जाहीर केले. त्यामुळे भाजपच्या संपर्कात असलेल्या वडाळा विधानसभेचे काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांचे काय होणार याबाबत सवाल उपस्थित होत आहे. शिवसेना महिला विभागप्रमुख व माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून वडाळा मतदारसंघाची बांधणी करण्यास सुरुवात केली, परंतु लोकसभेनंतर विधानसभा निवडणूकही युतीत लढण्याचे जाहीर केल्यानंतर कोळंबकर यांनी युतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. परंतु कोळंबकर हे भाजपच्या संपर्कात असून, वडाळा विधानसभेवर पहिला दावा हा भाजपचा असल्याने सध्या तरी कोळंबकर भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मानसिकेतत आहेत.

- Advertisement -

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत कोळंबकर यांना भाजपचे मिहिर कोटेचा यांनी घाम आणला होता. कोळंबकर यांचा अवघ्या ८०० मतांनी पराभव झाला होता, तर शिवसेनेचे हेमंत डोके तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे कालिदास कोळंबकर (३८,५४०) भाजपचे मिहिर कोटेचा (३७,७४०)आणि शिवसेनेचे हेमंत डोके (३२,०८०) यांना मतदान झाले होते. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे स्वतंत्र लढले असले तरी यापूर्वी हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहिलेला आहे.

मागील निवडणुकीत भाजपचे कोटेचा हे दुसर्‍या क्रमांकावर लढत असले तरी हा मतदारसंघ शिवसेनेकडेच होता आणि यावेळी युती नव्हती. त्यामुळे मागील निवडणुकीतील यशानंतर भाजप दावा करत असले तरी हा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे आणि राहणार असा दावा सेनेच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे. या मतदारसंघातून माजी महापौर श्रध्दा जाधव या इच्छुक आहेत, परंतु शिवसेनेतील काही असंतुष्ठ पदाधिकारी कोळंबकर यांना शिवसेनेत प्रवेश घडवून उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशीर आहेत. त्यातच खासदार राहुल शेवाळे यांनी कोळंबकर यांना प्रचारात ओढून घेत निवडून आल्यावर त्यांची भेट घेतली. कोळंबकर यांचा या मतदारसंघावर डोळा असला तरी फेसबूकवर श्रध्दा जाधव यांनी ‘विधानसभा २०१९’अशी पोस्ट व्हायरल करत मतदारांना सजग राहण्याच्या अप्रत्यक्ष सूचना केल्या आहेत.

- Advertisement -

कोळंबकर हे पूर्वाश्रमीचे शिवसेनेच आमदार होते, परंतु माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत कोळंबकरही गेले होते. त्यामुळे कोळंबकर यांच्या राजीनाम्यामुळे २००६मध्ये या मतदारसंघात पोटनिवडणूक झाली होती, परंतु कोळंबकर यांच्याविरोधात कोणीही लढण्यास तयार नव्हते. त्यावेळी श्रध्दा जाधव यांनी कोळंबकर यांना टक्कर दिली होती, परंतु लढता लढता शिवसेना हरली होती. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने कोळंबकर विरोधात दिगंबर कांडरकर यांना उमेदवारी दिली. २०१४ मध्ये हेमंत डोके यांना उमेदवारी दिली होती. मात्र, २००६ पासून आमदारकीची स्वप्ने पाहणार्‍या श्रध्दा जाधव यांची पक्षाकडून उपेक्षाच झाली आहे. परंतु २०१९च्या निवडणुकीसाठी पक्षाकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर जाधव कामाला लागल्या. परंतु युती झाल्यामुळे तसेच कोळंबकर यांचे अरिष्ट मागे लागल्याने त्यांची संधी पुन्हा हुकते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वडाळा विधानसभा क्षेत्रासाठी शिवसेना आग्रही आहे, परंतु मागील निवडणुकीतील आकडेवारीनुसार भाजप अग्रक्रमावर आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री हे यावर तोडगा काढतील. परंतु या मतदार संघावर दोन्ही पक्षाचा दावा असल्याने तसेच कोळंबकर यांचे पुनर्वसन भाजपला करायचे असल्याने पालघर मतदार संघातील फॉर्म्युला वापरला जाईल,असे सुत्रांकडून समजते. एक तर भाजपला हा मतदार संघ सेनेने सोडला तर ठीक, नाहीतर भाजप सेनेला तो सोडेल आणि कोळंबकर यांना उमेदवारी देण्याची अट घालेल,असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे श्रध्दा जाधव यांना दिलेला शब्द पाळतात की युती टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे सांगणे ऐकतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -