घरमुंबईमहिला पोलिसांशी हुज्जत घालणे पडले महागात

महिला पोलिसांशी हुज्जत घालणे पडले महागात

Subscribe

कर्तव्यावरुन घरी परतणार्‍या मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांशी हुज्जत घालून अश्लिल भाषा वापरल्याप्रकरणी बेस्ट बसच्या एका कंडक्टर आणि ड्राईव्हरला ताडदेव पोलिसांनी अटक केली आहे. रात्रपाळीस असणार्‍या महिला पोलीस शिपाई सकाळच्या सुमारास बेस्ट बसमधून प्रवास करत होत्या. यादरम्यान तिकीटावरुन कंडक्टर आणि महिला पोलिसांमध्ये वाद झाला पण कंडक्टरने चुकीची भाषा वापरल्याने ताडदेव पोलिसांनी दोघांनाही अटक केेलेली आहे.

महिला पोलीस शिपाई काजल बनसोड आणि त्यांच्या इतर तीन सहकारी या ताडदेवमधल्या महालक्ष्मी मंदिरात रात्रपाळीस बंदोबस्ताला होत्या. सकाळी ८ वाजता आपली ड्युटी संपवून त्या नायगावमधल्या पोलीस कार्यालयात परतत होत्या. त्यासाठी त्यांनी महालक्ष्मी मंदिराजवळून बेस्ट बस पकडली. बस हाजीअलीजवळ पोहोचताच बेस्ट कंडक्टर राजेंद्र कोंडूसकर (५२) याने महिला पोलीस शिपाईंना तिकीट विचारले असता आम्ही पोलीस आहोत त्यामुळे नियमानुसार आम्हाला तिकीट घेण्याची गरज नाही, असे काजल बनसोड यांनी सांगितले.

- Advertisement -

पण यावेळी कंडक्टर कोंडुसकर यांनी त्यांना ओळकपत्रे दाखवा असे सांगितले. त्यानुसार त्यांनी आपले ओळखपत्र दाखवलेदेखील, मात्र कोंडूसकर यांनी त्यांना उलट उत्तरे द्यायला सुरुवात केली. पोलीस असाल म्हणून काय झाले तुम्हाला सगळ्या गोष्टी आयत्या हव्या असतात त्याची तुम्हाला सवय लागली आहे, अशा शब्दांत त्यांनी उत्तर दिले. तुम्ही खरे पोलीस आहात असे मला वाटत नाही असे म्हणून कोंडूसकर यांनी चारही महिला पोलिसांचे मोबाईलवर फोटो काढायला सुरुवात केली. या गोष्टीला महिला पोलिसांनी विरोध करताच कंडक्टर राजेंद्र कोंडुसकर आणि त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली मात्र कंडक्टरने भान न ठेवता अश्लिल शब्द वापरायला सुरुवात केली. या दरम्यान बेस्ट बसचा चालक दिपक धनवडे (३४)हादेखील वादात पडला आणि त्यानेही महिला पोलिसांना सुनावले आणि बस ताडदेव बस आगाराच्या दिशेने वळवली. यादरम्यान त्यांनी ताडदेव पोलिसांना याबाबत कळवले होते.

बस आगारात पोहोचताच पोलिसांनी याबाबत चौकशी सुरु केली, तेव्हा महिला पोलीस शिपाई काजल बनसोड आणि त्यांच्या इतर सहकार्‍यांनी झालेल्या प्रकाराबद्दल पोलिसांना सांगितले. बसमधील प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनीसुद्धा कंडक्टर आणि ड्रायव्हर या दोघांनी मिळून महिला पोलिसांना विनाकारण त्रास दिल्याचे सांगितल्याने ताडदेव पोलिसांनी दोघांनाही अटक केली. दोघांनी मिळून महिलांना अश्लिल शब्द वापरुन अपमानित केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असल्याचे ताडदेव पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -