“सिम्बा” हतबल इमानदारीकडून, स्मार्ट हुशारीकडे…पोलीसपटांचा प्रवास

सामान्य माणसांना त्यांच्या कमकुवततेमुळे आपल्या रोजच्या धावपळीच्या जगण्यातून वेळ काढून भ्रष्ट आणि गुंडगिरीच्या व्यवस्थेविरोधात लढता येत नसतं. सामान्यांच्या या हतबलतेला कृतीशील हुशारीची जोड देऊन स्वतःला विजयी करण्याची इच्छा असलेला सिंघम किंवा सिम्बा प्रत्येकाला हवा असतो. ज्यावेळी तो पडद्यावर साकारला जातो तेव्हा आपल्यातल्या हतबलतेवर पडद्यावरच्या आपल्यासारख्याच सामान्य माणसाने मात केल्याचा काही तासांचा का होईना हा भ्रम सामान्य प्रेक्षकांना त्यामुळेच हवाहवासा वाटतो. हिंदी पडद्यावर कर्तव्यदक्ष पोलीस झालेले नायक आजपर्यंत हेच करत आले आहेत. हा भ्रम तिकिटबारीवर चित्रपटाच्या माध्यमातून यशस्वी करण्याचा प्रयत्न सिम्बामधून रोहित शेट्टीने पुन्हा केला आहे.

Simba
सिम्बा

सिंघम पहिला आणि दुसरा त्यानंतरचा रोहित शेट्टीचा सिंबा पोलीसपटांच्या त्याच ट्रॅकवर आहे. हिंदी पडद्यावर अमिताभच्या जंजीरपासून प्रकाश मेहरांनी लावलेल्या या रोपट्याला पुढे सत्तर ऐंशीच्या दशकात बहर आला. गोविंद निहलानींचा अर्धसत्य आणि चिरंजीवीच्या प्रतिबंधमधला पोलीस अधिकारी सोशिक होता. तो गुंडांच्या राजकीय, झुंडशाही व्यवस्थेपुढे हतबल होता. आता पडद्यावरचा पोलीसही हुशार आणि स्मार्ट झाला आहे. रोहित शेट्टीच्या पोलीसपटांनी सिंघमपासून हा हुशार पोलीस प्रकार हिंदी पडद्यावर नव्याने आणला. त्याआधीच दक्षिणेकडच्या पडद्यावर स्मार्ट पोलीस अधिकार्‍यांची परंपरा सुरू झाली होती. हि परंपरा पडद्यावर कमालीची, रोमँटीक, सिनेमॅटीक होती. त्यामुळेच प्रभुदेवाच्या, वॉन्टेड, राऊडी राठौडमधला पोलीस अधिकारी हुशारीने आणि वेळप्रसंगी कायद्यातल्या कच्च्या दुव्यांचा वापर करून भडक डायलॉगबाजी करून गुंड खलनायक मंडळींना नेस्तनाबूत करताना पाहणं सामान्य प्रेक्षकांना आवडलं होतं.

अजय देवगनचा हा स्मार्ट पोलीस अधिकारी सिंघममध्ये यशस्वी झाल्यावर रोहितने सिम्बामधून त्याला आणखी हुशार आणि भावनिक करत रणवीर सिंगला संग्राम भालेराव नावाने मराठी पोलीस इन्स्पेक्टर म्हणून पुढे आणलं आहे. कथानक विशेष नाही. ते चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच उलगडले आहे. केवळ हप्ते खाण्यासाठी आणि स्वतःचे खिसे भरण्यासाठी संग्राम भालेराव हा भ्रष्ट तरुण पोलीस दलात भरती झाला आहे. एका तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव होते. अशा आशयाच्या कथानकाचे ढिगाने सिनेमे हिंदी पडद्यावर आलेले असतात. त्यामुळे कथेत नाविन्य नाही.

मात्र, सिंघममध्ये हा स्मार्ट पोलीस अधिकार्‍याचा विषय जुन्याच्या तुलनेत काहीसा नवा होता. दिग्दर्शन आणि संवादावर बाळबोध प्रसंग असतानाही कथानकातल्या काहीशा नाविन्यामुळे तिकिटबारीवर सिंघम यशस्वी झाला. जब तक बैठने के लिए नही कहा जाता शराफत से खडे रहो…अशा हिंदी पडद्यावरच्या जुन्या पोलीस पटांमधल्या संवादांची खिल्ली उडवलेल्या प्रसंगांनी अजयचा सिंघम भरलेला होता. त्याला जोड होती अविश्वसनीय कथानकाची, गंगाजल, सरफरोशसारख्या वास्तववादी पोलीस पटांच्या आक्रंदनाचा काळ कधीचाच मागे सरला आहे. नव्या पिढीला हतबलतेवर रडत बसण्यापेक्षा मिळेला त्या मार्गाने यश मिळवायचं आहे. त्याचं प्रतिबिंब आताच्या चित्रपट कथानकांवरही उमटते आहे.

विषयाचं गांभीर्य मनोरंजनापेक्षा जास्त डोईजड होणार नाही. याची काळजी रोहित शेट्टी त्याच्या चित्रपटांतून घेत असतो. त्यामुळे तो वास्तववादी पोलीस पटांत अडकून पडत नाही. मात्र त्यात एक धोका असतो, चित्रपट भरकटण्याचा, रोहितने याआधीच्या पोलीसपटांत तो दिग्दर्शनातल्या कौशल्याने टाळलेला होता, मात्र सिम्बामध्ये तो टाळता आलेला नाही. त्यामुळे मध्यतंरापर्यंत चित्रपटाच्या कथेला सुरुवात होत नाही. मध्यंतराआधीचा संपूर्ण पडदा रणवीर सिंगला कमालीचा भ्रष्ट अधिकारी ठरवण्यातल्या प्रसंगांनी व्यापलेला आहे. जोडीला सारा आली खानसोबतच्या प्रेमप्रकरणाची जोड दिलेली आहे. त्यामुळे सुंदर सुंदर, रमणीय ठिकाणची गाणी पाहाण्याशिवाय प्रेक्षकांना पर्याय नसतो. आता हा भ्रष्ट अधिकारी संग्राम भालेराव (रणवीर सिंग) कर्तव्यनिष्ठ अधिकारी कसा बनतो. त्याला कोणती घटना कारण बनते, त्यानंतर तो खलनायकांना बडव बडव बडवून कसे वठणीवर आणतो ते प्रसंग म्हणजे सिम्बा सिनेमा. रोहितच्या इतर चित्रपटांसारखा याही चित्रपटाचा पडदा स्टुडिओमधल्या विविधरंगांनी भरलेला आहे.

चित्रपटाची कथा छोटी असतानाही पटकथा आणि संवादावर काम करून विषय प्रेक्षकांच्या गळी उतरवण्याचं कौशल्य रोहित शेट्टीला आहे. पुरावा नष्ट करण्यासाठी खलनायक गुंड मंडळी कुठल्याही थरापर्यंत जाऊ शकतात. हे या स्मार्ट संग्राम भालेरावच्या लक्षात कसं येत नाही, हे प्रेक्षकांच्याही लक्षात येऊ नये, यासाठीचा कथानकाला आवश्यक ठरणारा वेग दिग्दर्शकाने कायम ठेवला आहे. कानूनके हाथ लंबे होते है…किंवा ये वर्दी मेरा इमान है…असले कायद्याचा धाक दाखवणारे तद्दन टाळीबाज डायलॉग सिम्बामध्ये नाहीत. नव्या पिढीच्या प्रेक्षकांना त्यात रसही नाही. ते थेट न्याय निवाडा करण्यावर विश्वास ठेवतात. आताच्या बदलत्या सामाजिक मूल्यांचा परिणाम चित्रपटांच्या कथानकावरही झालेला आहे.

बलात्कारासारख्या कमालीच्या हिंसक गुन्ह्याविरोधात समान्यांमध्ये प्रचंड चिड असते. महेश मांजरेकरांच्या कुरूक्षेत्रमध्ये दशकभरापूर्वी हा विषय पोलीसपटातूनच येऊन गेला आहे. काळ बदलला तरी अत्याचार्‍यांची मानसिकता बदलेली नाही, हे सिम्बा सांगण्याचा प्रयत्न करतो. सिद्धार्थ जाधव, अरुण नलावडे, विजय पाटकर, सुचित्रा बांदेकर, सुलभा आर्य, अश्विनी काळसेकर या मराठी कलाकारांना हिंदी पडद्यावर एकाच वेळेस पाहण्याची संधी सिम्बाने दिली आहे. तर सारा अली खान पडद्यावर छान छान दिसते, छान छान हसते. अजय देवगनला ऐन वेळी पडद्यावर उतरून सिंघमचा, फ्लेव्हर आणि फिव्हर सिम्बामध्येही आणण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. तर अक्षय कुमारलाही सिम्बाच्या पडद्यावर ऐन वेळी आणून अजय देवगनच्या सिंघमपासून सुरू झालेलं पोलीस पटाचं कथानक सिम्बामध्येही संपलेलं नाही. थोडक्यात सिम्बानंतरही रोहितच्या पोलीस पटांच्या पडद्यावर इतक्यात पडदा पडणार नाही, ही सिक्वल पोलीसट परंपरा पडद्यावर पुढेही सुरूच राहाणार हे स्पष्ट आहे.