घरमुंबईभाईंदरमध्ये डेब्रिज विल्हेवाट कायदा धाब्यावर

भाईंदरमध्ये डेब्रिज विल्हेवाट कायदा धाब्यावर

Subscribe

स्वच्छ भारत अभियानातंर्गत डेब्रिजची विल्हेवाट लावण्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेने चार ठिकाणी आरक्षण टाकले आहे. मात्र, शहरात ठिकठिकाणी डेब्रिज रस्त्यावरच टाकले जात असून त्यावर महापालिका कोणतीच कारवाई करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बांधकाम कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आयुक्त बालाजी खतगावकर व बांधकाम विभागाने मोठा गाजावाजा करत कायदा सुुरु केला. तसेच डेब्रिज टाकण्यासाठी प्रभाग अधिकारी व नगररचना विभागाकडुन मंजुरी घेऊन महापालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या आरक्षण क्र. 270, 272, 321 व 356 या निश्चीत केलेल्या जागा जाहीर केल्या होत्या. बांधकाम करताना वा तोडताना निर्माण होणारा बांधकाम साहित्याचा काँक्रिट, माती, विटा, रेतीमिश्रीत सिमेंट, लाकुड, प्लॅस्टीक, स्टील आदी टाकाऊ कचरा हा रस्त्याच्या कडेला, सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागेत टाकल्यास 5 हजार रुपये दंड प्रति वाहन आकारले जाणार होते. शिवाय कांदळवन, पाणथळ, सीआरझेड क्षेत्रात टाकल्यास वाहन जप्त करुन पार्यवरण संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याचे शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया सुुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

त्यानुसार कायद्या प्रमाणे बांधकामाच्या कचर्‍याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. दररोज 20 टनापेक्षा अधिक व महिन्यास 300 टनापेक्षा अधिक बांधकाम कचरा निर्माण करणार्‍या उत्पादकाने त्याचे वर्गीकरण करुन काम सुरु करण्याआधी बांधकाम कचर्‍याच्या विल्हेवाटीचा आराखडा महापालिकेस सादर करणो बंधनकारक आहे. तर कमी डेब्रिज उत्पादकांना मुळ जागीच विल्हेवाट लावायची आहे. 10 ते 20 टक्के बांधकाम कचरा हा महापालिका वा शासनाने मंजुरी दिलेल्या बांधकामाकरता वापरणे कायद्याने बंधनकारक आहे.

हा कायदा करुन वर्ष झाले तरी इमारत, घर, चाळी वा अन्य कोणतेही बांधकाम करताना तसेच दुरुस्तीवेळी मोठ्या प्रमाणात डेब्रिज आदी अन्य टाकाऊ बांधकाम साहित्य रस्त्यालगत, सरकारी, महापालिका वा खाजगी जागेत बेकायदेशीरपणे सर्रास टाकले जाते. हे डेब्रिज हे शहर व पर्यावरण दृष्टीने संवेदनशील अशा कांदळवन, पाणथळ, सीआरझेड, नाविकास क्षेत्रत बेकायदा टाकुन भराव करत भुखंड तयार केले जातात. त्यावर बेकायदा बांधकामे उभी केली जात आहेत. शहरात बेकायदा बांधकामांवर कारवाई केल्यावर पडलेले डेब्रिजसुध्दा आजुबाजुला पसरवुन पुन्हा बांधकाम केले जाते वा अन्य ठिकाणी टाकले जात आहे.

- Advertisement -

घर, सोसायटी दुरुस्तीमधून निघणारे डेब्रिज उचलुन कुठेही बेकायदा टाकणारे लहान टेम्पो, डम्परवाले शहरात तयार झाले असुन यातुन अतिक्रमण, बेकायदा बांधकाम करण्यासाठी भराव करुन देण्यासह बक्कळ पैसे उकळले जात आहेत. यात महापालिकेच्या माती भराव विरोधी पथकासह प्रभाग समिती कार्यालये आणि आरोग्य विभागाचे सुध्दा साटेलोटे असल्याने कारवाई केली जात नाही. बेकायदा डेब्रिज, माती आदीच्या भरावामुळे पाणी वाहुन जाण्याचे नैसर्गिक मार्ग सुध्दा बंद होण्याच्या मार्गावर आले आहेत. भरावा मुळे शहरात पाणी तुंबण्याचे प्रकार वाढले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -