घरमुंबईधुक्यात हरवली माळशेजची वाट; पर्यटकांची गर्दी

धुक्यात हरवली माळशेजची वाट; पर्यटकांची गर्दी

Subscribe

सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगा डोंगराच्या चहूबाजूने दिसणारी दाट धुक्यात हरवलेली हिरवळ असे चित्र माळशेज घाटाचे आहे. थंडीतील हे निसर्गसौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. कल्याणपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरबाड-नगर-पुणे या मार्गावर माळशेज घाट लागतो. धुक्यात हरवलेले उंच डोंगर माथे, घनदाट जंगल, दुर्मीळ वन्यप्राणी पशुपक्षी यांचा मुक्त संचार, घाटातील नागमोडी रस्ते, वृक्षांची सभोवताली दिसणारी रांग आणि खोल दर्‍यांमध्ये पक्षांचा किलबिलाट असे भुरळ घालणारे निसर्गचित्र माळशेज घाटात अनुभवायला मिळत आहे.

पावसाळ्यात येथील धबधब्यात चिंब भिजण्यासाठी पर्यटक येतात, परंतु हिवाळ्यातही पर्यटकांनी माळशेज घाटाला विशेष पसंती दिली आहे. निसर्गाची मजा लुटण्यासाठी हिवाळ्यातील नोव्हेंबर महिन्यात पर्यटकांची शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी होत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, शहापूर, मुरबाड, नगर, पुणे, नाशिक या भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात माळशेज घाटात सहलीसाठी येत आहेत. घाटात आल्यावर येथील वानरं स्वागतासाठी तयार असतात. माळशेजमध्ये फेरफटका मारताना निसर्गाच्या कुशीत शिरल्याचा अवर्णनीय अनुभव मिळतो, असे पर्यटक जनार्दन टावरे यांनी सांगितले. या ठिकाणी स्थानिक आदिवासी ग्रामस्थांकडून आवळे, चिंच, कणसाची विक्री केली जाते. तसेच चहा, नाश्ता, वडापाव विक्रीतूनही त्यांना रोजगार उपलब्ध होतो.

- Advertisement -

माळशेज घाटात जायचे कसे?
माळशेज घाटात जाण्यासाठी खासगी वाहनाने अथवा कल्याणहून आळेफाटा-नगर-पुणे या परिवहनच्या एसटी बसने जाता येते. पर्यटकांना राहण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने येथे निवासस्थाने बनवली आहेत. येथे भोजनासाठी एक हॉटेलची सोय आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -