घरमुंबईभारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदासाठी अरविंद सावंत, सचिन अहिर यांच्यात चुरस!

भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदासाठी अरविंद सावंत, सचिन अहिर यांच्यात चुरस!

Subscribe

शिवसेनेला अडचणीच्या काळात मदत करणारी आणि आर्थिक ताकद देणार्‍या भारतीय कामगार सेनेच्या (बीकेएस) अध्यक्षपदी दक्षिण मुंबईचे खासदार, माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सेनेत आलेले सचिन अहिर यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, भारतीय कामगार सेनेसारखी ‘कामधेनू’ अहिर यांच्यासारख्या पाहुण्या नेत्याच्या हाती सोपवण्याऐवजी ती अरविंद सावंत यांच्यासारख्या निष्ठावान आणि अभ्यासू नेत्याच्या हाती सोपवण्यात यावी, अशी अपेक्षा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी आपलं महानगरकडे व्यक्त केली आहे. खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब, सरचिटणीस रघुनाथ कुचीक आणि उपनेते विनोद घोसाळकर हेही इच्छूक आहेत. मात्र संघटनेसाठी कॅबिनेटचा राजीनामा देणारे अरविंद सावंत हे ३५ वर्षे युनियन क्षेत्रातच काम करीत असल्याने तेच कामगारांना न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा कामगारांतही आहे.

सूर्यकांत महाडिक आजारी असताना अजित नाईक हे बीकेएसच्या संघटनेचा गाडा प्रशासकीय पातळीवर हाकत आहेत. त्यांनाही महाडिक यांचा उत्तराधिकारी म्हणून अध्यक्ष होण्याचे वेध लागले आहेत. मात्र, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आणि क्षमतेला खूपच मर्यादा आहेत. अरविंद सावंत यांचा जोरदार मुकाबला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले सचिन अहिर यांचा. शिवसेनेत आल्यावर उपनेतेपद मिळालेल्या अहिर यांचा मुळचा पिंड हा कामगार नेत्याचा आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघ या मिल कामगारांच्या संघटनेचे नेतृत्व अहिर करतात. त्याचप्रमाणे इतरही काही उद्योग व्यवसायांमध्ये सचिन अहिर यांची कामगार संघटना कार्यरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या नेतेपदाला आपल्या कार्यकौशल्याने न्याय देणे अहिर यांना तितकेसे जमलेले नाही.
सचिन अहिर हे राष्ट्रवादीत नेते असताना शिवसेनेत आल्यानंतर त्यांना तितकेच प्रतिष्ठेचे कोणतेही पद शिवसेना देऊन न शकल्यामुळे त्यांच्या मनात कमालीची अस्वस्थता आहे. त्यांच्या आवडीचे कामगार क्षेत्रातले हे पद ही त्यांच्यासाठी उत्तम सोय होऊ शकते, असे अहिर समर्थकांना वाटते. अहिरांना सेनेत केवळ उपनेतेपद वाट्याला आले असून विधान परिषेदेनेही त्यांना हुलकावणी दिली आहे. सचिन अहिर हे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यामुळे त्यांचे पारडे जड वाटत असले तरी अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच घेणार असल्याचे शिवसेनेच्या गोटात बोलले जात आहे.
भारतीय कामगार सेनेकडे मुंबईतली सगळी प्रमुख पंचतारांकित हॉटेल, मोठी इस्पितळे, विमानतळ आणि दीड हजाराच्या आसपास छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायांमध्ये शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत आहे. महाडिक यांच्या निधनानंतर हॉटेल, रुग्णालये तसेच छोटे आणि मोठे उद्योग-व्यवसाय यांची वेगवेगळी विभागणी करून संघटनेतल्या विश्वासू नेत्यांना त्यावर नियुक्त करावे, असा एक मतप्रवाह शिवसेनेत आहे. त्यामुळे एका छत्राखाली अनेक इच्छुक नेते सामावले जाऊ शकतात; पण त्यामुळे सुभेदारी निर्माण होऊ शकण्याची भीती ही ‘मातोश्री’ला वाटतेय. त्यामुळेच अरविंद सावंत यांच्यासारखा परळ- शिवडीच्या मुशीत तयार झालेला आणि बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्याबरोबरही तितकाच समरसून काम करणार्‍या कामगार नेत्याला भारतीय कामगार सेनेचा अध्यक्ष करण्याचे घाटत आहे.
सावंत आणि अहिर यांच्याबरोबर उपनेते, विभाग प्रमुख विनोद घोसाळकर आणि खासदार विनायक राऊत, सरचिटणी रघुनाथ कुचीक, खासदार अनिल देसाई आणि परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांचीही नावे चर्चेत आहेत. यापैकी विनोद घोसाळकर हे मुंबई इमारत दुरुस्ती विकास पुनर्रचना मंडळाचे चेअरमन आहेत. गेली पंचवीस वर्षे भारतीय कामगार सेनेत कार्यरत असलेले विनोद घोसाळकर हे महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रामध्ये कामगार असल्यापासून बीकेएसशी जोडलेले आहेत. सहसेक्रेटरी पदावरून कारकीर्द सुरू करणारे घोसाळकर सध्या कामगार संघटनेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष आहेत. विनायक राऊत हे सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे खासदार आहेत. मात्र, त्यांनाही भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदाचे वेध लागलेले आहेत. शिवसेनेतील जवळपास सात ते आठ नेत्यांना भारतीय कामगार सेना आपल्या अधिपत्याखाली यावी असे वाटत आहे. त्यापैकी या पदाचे सगळ्यात प्रबळ दावेदार हे अरविंद सावंत आणि सचिन अहिर हे समजले जातात. फेब्रुवारीमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अध्यक्षपदाच्या नावावर आपली मोहोर उमटवतील, असे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपलं महानगरला सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -