घरमुंबईअंडरवर्ल्ड डॉन फजलू रेहमानला अटक व कोठडी

अंडरवर्ल्ड डॉन फजलू रेहमानला अटक व कोठडी

Subscribe

खंडणी वादातून व्यवसायिकावर गोळीबार प्रकरण

खंडणी वादातून एका व्यावसायिकावर गोळीबार केल्याच्या कटातील मुख्य आरोपी फजलू उर रेहमान अब्दुल वासीत सिद्धीकी याला सोमवारी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फजलू हा अंडरवर्ल्ड डॉन असून त्याच्याविरुद्ध मुंबई, ठाणे, पुणे, गुजरात, राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यात 42 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात हत्येसह खंडणी, हत्येचा प्रयत्न, दरोडा, अपहरणसारख्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. जून 2005 रोजी ग्रँटरोड येथील एका व्यावसायिकाला फजलू रेहमान याने एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिली होती.

खंडणीची रक्कम दिली नाहीतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांसोबत ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करुन पेालिसांत खंडणीसाठी धमकी येत असल्याची तक्रार केली होती. 15 ऑक्टोंबरला या व्यावसायिकावर काही अज्ञात मारेकर्‍यांनी गोळीबार केला होता. त्यात ते जखमी झाले होते. याप्रकरणी डी. बी मार्ग पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह घातक शस्त्रे बाळगल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांचा तपास नंतर खंडणीविरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. जानेवारी 2006 रोजी फजलू रेहमानच्या चार सहकार्‍यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यात साजिद ऊर्फ राजू ऊर्फ बबलू बशीर अहमद सय्यद, हुसैन खुर्शीद आलम शेख ऊर्फ हसन ऊर्फ सलीम, शेरु नासीर हुसैन आणि सिराज आलम कमाल अहमद सयद यांचा समावेश होता.

- Advertisement -

या चारही आरोपींविरुद्ध नंतर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत त्यांच्याविरुद्ध मोक्का कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. याच गुन्ह्यांत सिराज सयद या दोषमुक्त करण्यात आले तर इतर तिघांनाही मोक्का कोर्टाने शिक्षा ठोठावली होती. या कटात फजलू हा मुख्य आरोपी होता, त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. विदेशातून फजलूचे प्रत्यार्पण होताच त्याला गुजरात पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. तेथील एका गुन्ह्यांत तो न्यायालयीन कोठडीत होता. त्याचा ताबा मिळावा यासाठी खंडणीविरोधी पथकाने लोकल कोर्टात अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर होताच त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी मुंबईत आणले होते. खंडणीसह हत्येच्या याच गुन्ह्यांत त्याला सोमवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मोक्का कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या अटकेनंतर अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची तसेच इतर महत्त्वाची माहिती उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -