“स्किझोफ्रेनिया नावाचा एक रोग असतो– विजय शिवतारेंचा संजय राऊतांना टोला

शिंदेगटात सामील झालेले माजी आमदार विजय शिवतारे यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. यावर शिवतारे यांनी संजय राऊत हेच बंडाळीसाठी कारणीभूत आहेत असा आरोप केला आहे.

vijay shivtare

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी करत भाजपबरोबर सत्तास्थापन केली आणि ते राज्याचे मुख्यमंत्रीही झाले. पण तरीही शिवसेना आणि शिंदेगटातील आरोप प्रत्यारोपाचे सत्र मात्र अद्यापही सुरूच आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून शिवसेनेच्या या दैन्यावस्थेचे खापर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर फोडले जात आहे. शिंदेगटात सामील झालेले माजी आमदार विजय शिवतारे यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. त्यावर एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत शिवतारे यांनी संजय राऊत हेच बंडाळीसाठी कारणीभूत आहेत असा आरोप करत स्किझोफ्रेनिया नावाच्या मानसिक आजाराचा हवाला देत संजय राऊतांवर निशाणा साधला .

यावेळी शिवतारे यांनी त्यांच्या पक्ष सोडण्याच्या निर्णयापासून त्यामागच्या कारणापर्यंत सर्वच मुद्दयावर आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी मी २९ जूनला पुण्यात पत्रकार परिषदेत शिंदेसोबत जाणार असल्याचे स्पष्ट केलं होतं. महाविकास आघाडी आम्हाला मान्य नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर फारकत घ्यावी असं सांगितल. शिंदेंना पण हेच हवं होत. पण उद्धव ठाकरे हे करायला तयार नव्हते. मग मी शिवसेनेतून बाहेर पडलो. मग ते काय माझी हकालपट्टी करणार असा सवाल शिवतारेंनी यावेळी केला. तसेच संजय राऊतांमुळेच पक्षात बंडाळी झाली. राऊतांची शिवसेनेशी किती निष्ठा आहे आणि शरद पवारांशी हे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. मग उद्धव ठाकरेंना हे का कळत नाहीये. आताही पक्षाचे एवढे नुकसान झाल्यावरही उद्धव ठाकरे कार्यकत्यांना काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जुळवून घेण्यास सांगत आहेत. हे काय आहे भानामती आहे की हिप्नॉटीजम असा प्रश्न सगळ्यांना पडायला लागल्याचे शिवतारे यावेळी म्हणाले.

वैद्यकिय क्षेत्रात स्किझोफ्रेनिया नावाचा एक रोग असल्याचे शिवतारेंनी यावेळी सांगितले. हा रोग हुशार लोकांनाच होतो. मग ते अतीविचाराच्या गर्तेत जातात त्यांना वेगवेगळे भास होतात असा हवाला देत त्यांनी राऊतांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी राऊत यांच्या काही विधानांचा दाखला दिला. गोव्यात आमच्याशिवाय सरकार होणार नाही त्यांनी सांगितले होते. आदित्य ठाकरेला तिकडे घेऊन गेले. नंतर उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाचा झेंडा घेऊन योगीला नमवू शकतो. उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करू शकतो. राऊतांनी केलेल्या या दाव्यांचा यावेळी शिवतारेंनी समाचार घेतला.
तसेच मी शिंदेसोबत जात असल्याचे कळवूनही उद्धव ठाकरे यांनी साधा एक फोनही केला नाही. अडीच वर्षात भेटीची वेळही दिली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तसेच लवकरच संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी ते पदाधिकारी शिंदेगटात जाणार असल्याचा इशाराही शिवतारेंनी यावेळी दिला.