घरमुंबईकोरोना व्हायरसमुळे हॅटट्रिकपासून वंचित

कोरोना व्हायरसमुळे हॅटट्रिकपासून वंचित

Subscribe

वर्ल्ड व्हिसलिंग चॅम्पियनशिप रद्द झाल्याने मराठी तरुण निखिल राणे निराश

चीनमधील कोरोना व्हायरसने जगाला धडकी भरवली आहे. त्यामुळे चीनमधून येणार्‍या प्रवाशांवर बारीक नजर ठेवण्यात येत आहे. असे असताना भारतामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर यंदा चीनमध्ये होणारी वर्ल्ड व्हिसलिंग चॅम्पियनशी स्पर्धा रद्द करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे. देशभरातील खेळाडूंच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला असला तरी सलग तीन वेळा विजेतेपद पटकावण्यासाठी मराठी खेळाडू निखिल राणे याला आता आणखी दोन वर्षेे वाट पाहावी लागणार आहे.

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे चीनमधून येणार्‍या प्रवाशांपासून ते अन्य उत्पादनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. कोरोना व्हायरसच्या भितीमुळे भारतामध्ये चिकन खाणे, मासे खाणे त्याचबरोबर चीनी उत्पादने वापरण्याबाबत नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. कोरोना व्हायरसचा फटका संपूर्ण जगाला बसत असून, शेअर मार्केटही कोसळत आहे. जगभर पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या विषाणूबाबत जागतिक आरोग्य परिषदेनेही चिंता व्यक्त केली आहे. असे असताना चीनमध्ये दर दोन वर्षांनी होणार्‍या वर्ल्ड व्हिसलिंग स्पर्धाही धोक्यात सापडली आहे. या स्पर्धेमध्ये जगातील विविध देश सहभागी होतात. यावर्षी या स्पर्धेमध्ये जगातील १८३ स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये भारतातून तीन होते. व्हिसलिंग चॅम्पियनशीप या स्पर्धेत मुंबईकर निखिल राणे याने उल्लेखनीय कामगिरी करत सलग दोनदा विजेतेपद पटकावले होते.

- Advertisement -

निखिलच्या या विजेतेपदामुळे भारतामध्ये या स्पर्धेबद्दल लोकांना माहिती होण्यास मदत झाली. यावर्षी हॅट्ट्रिक करण्याच्या उद्देशाने राणेने पूर्ण तयारी केली होती. परंतु नेमके यावर्षी चीनमध्ये कोरोनाने थैमान माजवल्याने ही स्पर्धा रद्द करत आता थेट दोन वर्षांनी घेण्याचा निर्णय आयोजनकांनी घेतला आहे. त्यामुळे निखिलला हॅट्ट्रिकपासून वंचित राहावे लागणार आहे. हॅट्ट्रिकच्या संधीसाठी त्याला दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. विजयाची हॅट्ट्रिक साजरी करायची हुकली त्यामुळे थोडा नाराज असल्याची भावना निखिलने व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -