घरताज्या घडामोडीयोगी आदित्यनाथांनी डाव टाकलाच; नोएडामध्ये हजार एकरच्या फिल्मसिटीची घोषणा!

योगी आदित्यनाथांनी डाव टाकलाच; नोएडामध्ये हजार एकरच्या फिल्मसिटीची घोषणा!

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मुंबईतल्या व्यवसाय आणि बॉलिवुड क्षेत्रातील दिग्गजांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये व्यवसायांसाठी घेतल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांविषयी माहिती दिली. यासोबतच, उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये १ हजार एकर क्षेत्रामध्ये मोठी फिल्मसिटी उभारण्याची देखील घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेश सरकार मुंबईतली बॉलिवुड इंडस्ट्री उत्तर प्रदेशला नेत असल्याचे आरोप केले जात होते. संजय राऊतांनी देखील यावर टीका केली होती. त्यावर देखील आदित्यनाथ यांनी यावेळी भाष्य केलं.

‘उत्तर प्रदेशात आम्ही जागतिक स्तरावरच्या फिल्म इंडस्ट्रीची स्थापना करणार आहोत. या क्षेत्राशी संबंधित लोकांशी चर्चा झाली आहे. ही फिल्मसिटी एनसीआरमध्ये अर्थात नोएडामध्ये बनवली जाणार आहे. आशियाचं सर्वात मोठं विमानतळ नोएडा ग्रीन सिटीजवळच्या जेवरमध्ये तयार केलं जाणार असून त्यापासून ६ किलोमीटर अंतरावर १ हजार एकरच्या क्षेत्रात ही फिल्मसिटी उभारली जाणार आहे. या ठिकाणाहून तासाभरात आग्र्याला पोहोचता येईल’, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

- Advertisement -

‘कुणी काही घेऊन जात नाही. बॉलिवुड काही पाकिट नाही कुठे घेऊन जायला. ही एक खुली स्पर्धा आहे. सामाजिक सुरक्षा, प्रत्येकाला काम करण्याची संधी, कुणाशीही भेदभाव होणार नाही अशी व्यवस्था निर्माण करायची आहे. मुंबई फिल्मसिटी मुंबईत काम करेल. उत्तर प्रदेशात नव्या फिल्मसिटीच्या उभारणीचं काम सुरू आहे. या क्षेत्रातल्या दिग्गजांच्या अनुभवांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली आहे. आम्ही कुणाच्याही विकासाच्या आड येत नाही आहोत’, असं देखील योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

दरम्यान, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘मुंबईच्या फिल्मसिटीला १०० वर्षांचा इतिहास आहे. कुणीही असंच ती हिसकावून घेऊ शकत नाही’, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.’आम्ही कुणाकडूनही काही हिसकावून घ्यायला आलेलो नाही. आम्ही तर नवी फिल्मसिटी उभारत आहोत. प्रत्येकाला काम करण्यासाठी सुरक्षित आणि चांगली संधी मिळायला हवी. जो ती देऊ शकेल, लोकं तिथे काम करायला जातील आणि उत्तर प्रदेश यासाठी तयार आहे’, असं योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -