घरनवी मुंबईनमुंमपाच्या उद्यान विभागात १४ कोटींचा घोटाळा;चौकशी मागणी

नमुंमपाच्या उद्यान विभागात १४ कोटींचा घोटाळा;चौकशी मागणी

Subscribe

पालिकेने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन; समाज समता कामगार संघटनेचा इशारा

नवी मुंबई-:
नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान (Nmmc garden Department)  विभागातील अधिकार्‍यांच्या संगनमताने ठेकेदारांकडून पालिकेची तिजोरी लुटण्याचा प्रकार सुरु आहे. शहरातील उद्यान देखभाल आणि दुरुस्ती, संवर्धनाच्या नावाखाली १४ कोटींचा अपहार (14 crore) झाल्याचा आरोप करत समाज समता कामगार संघटनेने या घोटाळयाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत पालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, एनआयआर पोलिसांना निवेदन दिले आहे. येत्या आठवडा भरात पालिकेने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे सरचिटणीस मंगेश लाड यांनी दिला आहे.

सरचिटणीस लाड यांनी दिलेल्या निवेदनात पालिकेच्या उद्यान विभागात २१ जून २०२१ पासून ते आजपर्यंत दरमहा साधारण ५० लाखानुसार बेलापुर ते दिघा क्षेत्रातील उद्यान देखभाल, दुरुस्ती आणि संवर्धनाच्या नावाखाली १४ कोटी रुपयांचा अपहार उद्यान विभागातील अधिकारी आणि संबंधीत ठेकेदाराने संगनमताने केल्याचा आरोप केला आहे. संबधित ठेकेदाराने काम न करता पैसे उकळून महापालिकेचे आर्थिक नुकसान केले आहे. त्यामुळे या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करून फौजदारी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी लाड यांनी केली आहे.

- Advertisement -
  • पालिकेने निविदा प्रक्रिया राबवून जून २०२१ पासून बेलापुर येथे संकेत इंटरप्रायझेस व प्रविण इंटरप्रायझेस,नेरूळसाठी जय भवानी कन्स्ट्रकशन, वाशी एन.के.शहा इन्फ्रा, तुर्भे डी.बी.इंटरप्रायझेस, कोपरखैरणेआगास्कर गार्डन कॉन्ट्रॅक्टर, घणसोलीत दर्शन इंटरप्रायझेस, ऐरोलीत हिरावती इंटरप्रायझेस, पामबीच रोडसाठी पी.ए.मेहर आणि ठाणे-बेलापुर रोडचे काम आर.पी.भगत या दहा ठेकेदारांना दिले आहे.
  • कार्यादेशाप्रमाणे कामाचे मानक मनुष्यबळ असून २००० चौरस मीटर उद्यानाच्या देखभाल दुरुस्ती कामासाठी एक कामगार नेमला आहे. कामाचे दर पालिकेने ठरवून दिलेल्या किमान वेतन दरांच्या आधारे घेण्यात आले आहेत. निविदेतील अटी शर्ती प्रमाणे एका कर्मचार्‍याने २००० चौरस मिटर क्षेत्रफळ उद्यान देखभाल दुरुस्ती करायची असते. याप्रमाणे सोबत जोडलेल्या क्षेत्रफळानुसार कामगार नेमणे आवश्यक असताना ठेकेदार कामासाठी आवश्यक कर्मचार्‍यापेक्षा कमी कामगार वापरुन पालिकेची दिशाभुल केल्याचा आरोप लाड यांनी निवेदनात केला आहे.

    पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी गंभीर घोटाळ्याची दखल घ्यावी, त्याच प्रमाणे पालिका व पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल करुन ठेकेदारांवर कारवाई करावी, येत्या आठवडा भरात पालिकेने कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
    मंगेश लाड, सरचिटणीस-समाज समता कामगार संघ, नवी मुंबई.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -