अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा सुरुच

त्याचप्रमाणे प्रभागात जवळजवळ रोजच कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

वसई : वसई -विरार शहर महापालिका क्षेत्रात दिवाळीच्या काळात अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे यांवरील कारवाई काही कालावधीकरिता कमी झाली असली तरी दिवाळीच्या समाप्तीनंतर पुन्हा अनधिकृत बांधकामाविरुद्ध कारवाई मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.
प्रभागात होणारी अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही पदसिद्ध अधिकारी म्हणून प्रभाग सहाय्यक आयुक्त यांचीच आहे आणि त्याबाबत त्यांनाच सर्वस्वी जबाबदार धरले जाईल, असा इशारा आयुक्त अनिलकुमार पवार यांनी प्रभाग अधिकार्‍यांना दिवाळीपूर्वी घेतलेल्या बैठकीत दिला होता. त्याचप्रमाणे प्रभागात जवळजवळ रोजच कारवाई करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.

आयुक्तांच्या इशार्‍यानंतर कारवाईने जोर पकडला आहे. प्रभाग समिती बी, सी, एफ व जी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध गाळ्यांवर, खोल्यांवर तसेच इमारतींवर कारवाई करण्यात आली. एकाचवेळी चार प्रभागात कारवाई करण्याचे निर्देश उप-आयुक्त अजित मुठे यांनी प्रभाग अधिकार्‍यांना दिले होते. या प्रभागांमध्ये कारवाई करण्यात आली. या चार प्रभागात अनधिकृत बांधकामांविरुद्ध निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी जवळजवळ पाच हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. प्रथमतः अनधिकृत बांधकाम होत असल्याचे प्रभाग अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून द्यायची जबाबदारी ही प्रभागातील अभियंत्यांची असल्याने अभियंत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावरही कारवाई प्रस्तावित केली जाईल अशा आशयाच्या सूचना उप-आयुक्त अजित मुठे यांनी अतिक्रमण विभागातील सर्व अभियंत्यांना दिल्या आहेत. आयुक्तांच्या आदेशानुसार यापुढेही कारवाया सुरु राहणार असे उप-आयुक्त अजित मुठे यांनी सांगितले.